Talathi Bharti Exam News: सर्व्हर डाऊन असल्याने तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसत आहे. लातूर, नागपूर, औरंगाबाद, पुणे येथील परीक्षा केंद्रावरुन उमेदवारांच्या तक्रारी येऊ लागल्या आहे.
राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरु आहे. विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजता विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासून परीक्षा सुरु होणार होता. दरम्यान अनेक केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्या आहेत. विविध जिल्ह्यातून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे साडे सात वाजता सुरु होणारा पेपर अद्याप सुरू होऊ शकला नाही. परीक्षा केंद्राबाहेर हजारोच्या संख्यने विद्यार्थी पोहचले असून गोंधळ उडालेला दिसत आहे.
प्रशासन आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थेची यामध्ये चूक आहे. विद्यार्थ्यांची काही चूक नसल्याने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. विविध जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत आहेत.
तलाठी भरती परीक्षेसाठी उमेदवारांकडून 1 हजार रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आले. राज्यभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले आहेत. असे असताना विद्यार्थ्यांची गैरसोय होणे हा प्रकार संतापजनक आहे.
नागपूर पाठोपाठ संभाजी नगरच्या पीएस कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. याबद्दल प्रशासन काही माहिती देण्यात येत नाही. ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले त्याचे अधिकारी परीक्षा केंद्रावर उपस्थित आहेत. पण ते काहीच बोलायला तयार नाहीत.
सकाळी 10, दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 वाजता अशा तीन सत्रांमध्ये ही परीक्षा आहे. सकाळच्या सत्राचीच परीक्षा खोळंबल्याने दिवसभराच्या सर्व परीक्षांवर परिणाम होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
नक्की पेपर कधी सुरु होणार, कोणाला माहिती विचारावी? याबद्दल विद्यार्थ्यांना काही माहिती नाही. विद्यार्थ्यांनी मीडियाशी बोलू नये म्हणून त्यांना हॉलमध्ये बसून ठेवले आहे.
आधीच परीक्षा केंद्र वाटप करताना गोंधळ घालण्यात आला. विद्यार्थ्यांना भलतेच परीक्षा केंद्र देण्यात आले. तसेच काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बॅग ठेवण्याचेही पैसे घेत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या गोंधळानंतर सकाळी 10 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास औरंगाबाद, अमरावतीसह विविध परीक्षा केंद्रात परीक्षा सुरु झाल्या आहेत.