पंतप्रधानांच्या नावाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे धक्कादायक कृत्य; डॉक्टरला घातला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांना धक्का बसलाय

Updated: Oct 13, 2022, 05:18 PM IST
पंतप्रधानांच्या नावाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे धक्कादायक कृत्य; डॉक्टरला घातला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा title=
(फोटो सौजन्य - PTI)

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या तिहार तुरुंगात (tihar jail) आहे. ईडीकडून (ED) याप्रकरणी तपास केला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन (jacqueline fernandez) सुकेशच्या जाळ्यात अडकल्याने या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र नागपुरातही (Nagpur) अशाच एका सुकेश चंद्रशेखरने एका डॉक्टरला कोटींचा गंडा घातला आहे. नागपुरात स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (social media influencer) म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने नामांकित होमिओपॅथी डॉक्टरची तब्बल साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. मात्र हा आकडा आणखी कित्येक पटीने वढण्याची शक्यता आहे. (nagpur social media influencer cheated a doctor)

माझी पंतप्रधान कार्यालयात, सीबीआयमध्ये ओळख आहे असा खोटा बनाव करत या व्यक्तीने फसवणूक केली आहे. पीडित डॉक्टरला होमिओपॅथी कॉलेज उघडून देतो, कोट्यावधीचा सीएसआर फंड मिळवून देतो असं आमिष फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने दिलं होते. तसेच सीबीआय धाड पडणार असल्याचं सांगत साडेचार कोटी रुपये डॉक्टरकडून उकळले. अखेर फसवणूक झाल्याचं समजताच डॉक्टरने कोतवाली पोलीसात तक्रार दाखल केली. अजित पारसे असं या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं नाव आहे. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढत त्याचं काम सांभाळात असल्याचं सांगत या व्यक्तीने डॉक्टरचा विश्वास संपादन केला आणि ही फसवणूक केली.

दरम्यान, अजित पारसे प्रकृती खराब असल्यानं खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे अद्याप त्याला अटक केली नाही. पण घराची झाडाझडती घेतली तेव्हा आणखी धक्कादायक बाबी पोलिसांना मिळून आल्या आहेत. यामध्ये त्याच्या घरातून अनेक बनावट कागदपत्रे, शासकीय कार्यालयाचे सही शिक्के, स्टॅम्प, तसेच पोलिसांचं लेटरहेड, राजकीय नेत्यांच्या नावांचे लेटरहेड महागडी घड्याळे यासह अन्य वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेय. सुरुवातीला याप्रकरणी एकच तक्रारादार समोर आला असला तरी आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. यामध्ये हनी ट्रॅपचे सुद्धा प्रकरण असल्याची शंका पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केली आहे.