घाबरु नका म्हणत दरोडेखोरांनी घेतला मुलांचा मुका; तीन कोटींच्या दरोड्याची सर्वत्र चर्चा

दरोडेखोरांनी सीसीटीव्ही डीव्हीआरऐवजी वायफाय बॉक्स घेऊन पळ काढलाय

Updated: Oct 13, 2022, 03:13 PM IST
घाबरु नका म्हणत दरोडेखोरांनी घेतला मुलांचा मुका; तीन कोटींच्या दरोड्याची सर्वत्र चर्चा title=

लातूर : एका व्यावसायिकाच्या घरावर मोठा दरोडा (Robbery) पडल्याची घटना लातूर (Latur) शहरात घडली आहे. दरोडेखोरांच्या टोळीने शस्त्राच्या जोरावर सुमारे 2 कोटींहून अधिक रुपयांची रोकड आणि 73 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला आहे. बुधवारी पहाटे हा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरोडेखोर व्यावसायिकाच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना पिस्तूल आणि धारदार शस्त्रांनी धमकावले. लातूर जिल्ह्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा आहे. कन्हैयानगर भागातील व्यापारी राजकमल अग्रवाल यांच्या घरी बुधवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

चार ते पाच दरोडेखोरांची टोळी राजकमल अग्रवाल यांच्या घरात घुसली. त्यानंतर राजकमल यांना झोपेतून उठवून त्यांच्या मानेवर चाकू ठेवला आणि पिस्तूल व इतर शस्त्रे दाखवून धमकावण्यात आले. त्यावेळी घरात पत्नी, मुलगा आणि सून असे कुटुंबातील आणखी तीन सदस्य उपस्थित होते. चोरट्यांनी कुटुंबीयांना धमकावून सदस्यांचे मोबाईल हिसकावले. त्यांनी अग्रवाल यांच्याकडून लॉकर, कपाटाच्या चाव्या घेऊन 2 कोटी रुपयांची रोकड आणि 73 लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

चोरी करून जात असताना चुकून दरोडेखोरांनी सीसीटीव्ही डीव्हीआरऐवजी वायफाय बॉक्स घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच चोरटे 25 ते 30 वयोगटातील असून ते मराठी बोलत असल्याचे सांगितले. दरोडेखोर घटनास्थळावरून फरार होताच अग्रवाल यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, राजेश अग्रवाल यांच्या घरात दरोडेखोर घुसल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवला. मात्र कोणालाही इजा केली नाही. यावेळी दरोडेखोरांनी दोन मुलांची पप्पी घेत घाबरु नका असे सांगितले. त्यानंतर अग्रवाल यांच्या गळ्यातील लॉकेट देवाचे आहे, असे पत्नीने सांगितल्यानंतर दरोडेखोरांनी ताई घाबरु नका असे म्हणत ते लॉकेट सोडून दिलं.