नागपूर : सतरंजपुरात राहणाऱ्या ६८ वर्षाच्या एका माणसाला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा ५ एप्रिल रोजी मृत्यू देखील झाला आहे. पण जाता-जाता तो ४१ जणांना कोरोना देवून गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. ६२ व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर तात्काळ त्याच्या कुटुंबातील २१ जणांवर कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १५ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
परिस्थितीचा अंदाज घेत या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या १९२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी २६ जणांना कोरोना झाला. सध्या त्याच्या सहवासात आलेल्या १४४ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नागरिकांशिवाय कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांच्या असिस्टंटलाही कोरोनाची लागण झाली आहे. आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
याप्रकरणी नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी लक्षणं असल्यास नागरिकांनी स्वत:ला तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. 'कोरोनाची लक्षणं असल्यास लपवू नका. दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. स्वत:ची आणि इतरांची देखील काळजी घ्या.' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
एकंदर पाहता सध्याच्या घडीला देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा १७२६५ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये मागील २४ तासांमध्ये १५५३ नवे रुग आढळून आले आहेत. तर, ३६ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.