नागपूर- जीवघेण्या नॉयलॉन मांजाने नागपुरात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.नॉयलॉन मांजाच्या वापरावर बंदी असली तरी अजूनही बाजारात नायलॉन मांजाची विक्री सर्रास सुरु आहे .मात्र यंदा नागपूर पोलिसांनी संक्रांतीच्या महिन्याभरापूर्वीच नॉयलॉन मांजाविरुद्ध मोठी मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी नायलॉन मांजाविरुद्धची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.तब्बल 336 नॉयलॉन मांजाच्या चक-या जप्त करण्यात आल्या आहेत.
मकरसंक्रातीला नागपुरात पंतगबाजीला मोठ उधाण येतं.मात्र या उत्सवाला गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजा वापरणा-या पतंगाबाजांमुळं गालबोट लागलं आहे.अनेक पतंगबाज नायलॉन मांजाचा वापर करतात,त्यामुळं अनेक अपघात झाले आहेत.अनेकांना गंभीर दुखापत झाली,या जीवघेणा मांजामुळं अनेकांना जीवही गमावावा लागला. शेकडो पक्ष्यांचा नायल़ॉन मांजामध्ये अडकून मृत्यू झाला आहे.त्यामुळं या मांजावर बंदी टाकण्यात आली आहे. प्रशासनही नायलॉन मांजा न वापरण्याचं आवाहन सातत्यानं करत आहे.
बाजारात या घातक नॉयलॉन मांजा मोठ्या प्रमाणात विक्री अजूनही होत असल्याचं सातत्यानं समोर येतं आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाविरुद्ध धडक मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी नागपूर पोलिसांनी झोन तीनमध्ये नायलॉन मांजाविरुद्धची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई केली. जीवघेणा नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. 336 नायलॉन मांजाच्या चक-या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.नायलॉन मांजा विक्रेता वेगवेगळ्या मार्गाने शहरात नायलॉन मांजा विक्रीकरिता आणत असल्याची गुप्त माहिती तहसील पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे एका ट्रकमध्ये नायलॉन मांजा गांधीबाग येथे येत असल्याचं पोलिसांना समजलं.त्यामुळं पोलिसांनी सापळा रचून ट्रक क्रमांक एचआर 55 एस -3207 कारवाई केली. नागपूर भोपाळ ट्रान्सपोर्टचा हा ट्रक गांधीबाग येथे येताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला. त्यामध्ये असलेला नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला. हा मांजा सहा पांढऱ्या रंगाच्या पोत्यात ठेवण्यात आला होता.सहा बॉक्समध्ये एकूण 336 चक-या पोलिसांना मिळून आल्या आहे. त्याची एकूण किंमत किंमत 2 लाख 35 हजार 200 रुपये आहे.
दरवर्षी नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात गेल्यावर्षी नायलॉन मांजामुळे गळा कापला जावून जीव गमवल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे हा धोका लक्षात घेता नागपूर पोलिसांनी खरेदीवर व विक्रीवर करणा-याविरुद्ध ही मोहिम सुरु करताना कठोर पाऊल उचलत आहे.