अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात उत्साहात होत असताना नागपुरातील एक महिला चक्क सायकलिंग करताना योगसाधना करतात. नागपुरच्या मंगला पाटील रोज पहाटे सायकलिंग करताना योगसाधना करतात. नागपुरच्या 43 वर्षीय मंगला पाटील धंतोली परिसरात रहातात. सायकल चालवताना योगसाधना करत असल्यानं मंगला पाटील यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंगला पाटील या योग प्रशिक्षिका आहे. गेल्या 8 वर्षांपासून सायकलवर योगसाधना करतात.
मंगला पाटील रोज सकाळी सायकलवर सुक्ष्म व्यायाम, प्राणायाम यांसह विविध योगप्रकार अगदी सहजपणे करतात. सायकलवर योगसाधना करताना त्यांचं संतुलनही कमालीचं असतं. मंगला पाटील यांना सायकलिंगची आवड अगदी बालपणापासूनच होती. तर गेल्या 20 वर्षांपासून त्या नित्यनियमाने योगसाधनाही करतात.
दरम्यान सायकलिंग करताना योगाभ्यास करण्याची कल्पना त्यांना 8 वर्षांपूर्वी आली. सुरुवातील त्यांना त्रास झाला. मात्र सराव केल्यानंतर सायकलवर अगदी सहजपणे विविध योगप्रकार त्या करतात. त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. प्रत्येकाने चांगल्या आरोग्याकरता योगसाधना करावंचं असं आवाहनही मंगला पाटील यांनी केलं.