नाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह

Nagpur Crime : नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने नाश्ता दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा घराबाहेर निघून गेला होता. बऱ्याच वेळानंतर मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

आकाश नेटके | Updated: Dec 4, 2023, 12:36 PM IST
नाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Nagpur Crime : नागपुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.  शुल्लक कारणावरुन एका अल्पवयीन मुलाने रागावून रेल्वे रुळांशेजारी जाऊन आत्महत्या केली आहे. मुलाच्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. आईसोबत झालेल्या वादातून मुलाने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. रागातून मुलगा घरातून निघून गेला होता. आई वडीलांनी पोलिसांत धाव घेऊन त्याचा शोध सुरु केला. मात्र शेवटी त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरच्या कन्हान पिंपरी परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे.  सकाळी नाश्त्यावरून मुलाचा त्याच्या आईसोबत वाद झाला होता. त्यामुळे तो घरातून निघून गेला होता. मात्र रविवारी त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मुलाच्या कुटुंबियांना याची माहिती देताच सर्वांना धक्का बसला.

रविवारी पोलिसांना एका मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे या तरुणाच्या बेपत्ता झाल्याचा गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे का, याचा शोध पोलीस घेत होते. मुलाच्या पालकांनी पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तात्काळ कुटुंबियांशी संपर्क साधला. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला आहे.

सकाळी मुलगा आईकडे नाश्ता मागितला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र नाश्ता तयार न झाल्याने यावरून मुलाचे आईशी जोरदार भांडण सुरू झाले. त्यानंतर तो रागाने घरातून निघून गेला. बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने फोन उचलला नाही. त्यानंतर पालकांनी त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मुलाबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी कुटुंबियांना मुलाने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

"मुलाच्या तपासादरम्यान, रविवारी सकाळी हा मुलगा रेल्वे रुळाजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. न्यू कॅम्पटी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र मुलाने खरोखरच आत्महत्या केली की यामध्ये दुसरं काही घडलं आहे याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

चांगले जेवण बनवलं नाही म्हणून आईची केली हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाण्यातही असाच प्रकार घडला होता. जेवण चवदार न वाटल्याने मुलाने आईवर विळ्याने हल्ला करून तिची हत्या केली.  शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुरबाड तालुक्यातील वेळू गावात ही धक्कादायक घटना घडली. आई आणि मुलामध्ये वारंवार भांडणे होत होती.