'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Nagpur Crime : नागपुरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. मित्रांना घरातील सगळी माहिती देत महिलेनं चोरीचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 1, 2023, 09:56 AM IST
'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : पती आपल्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून लग्नापूर्वीच्या मित्राच्या मदतीने पत्नीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये (Nagpur Crime) समोर आला आहे. आरोपी महिलेने मित्राच्या मदतीने घरातून तब्बल 13 लाख रुपयांची चोरी केली आहे. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होती. तपासामध्ये पोलिसांनी महिलेवर संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी महिलेचं बिंग फोडल्यानंतर आता जेलवारी करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. 

शिवानी सुमित यादव असं या महिलेचं नाव असून रजत डोंडलकर, हर्ष पानतावणे अस चोरी करणाऱ्या मित्रांची नावे आहेत. नागपुरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गड्डीगोदम येथे राहणाऱ्या सुमित यादव नावाच्या व्यक्तीने घरच्यांचा विरोध झुगारत 10 वर्षांपूर्वी शिवानी सोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या संसाराला 10 वर्ष लोटली. पण काही महिन्यापूर्वी सुमितचा अपघात झाल्यानं त्याला शारीरिक दुखापत झाली होती. त्यानंतर दोघांमध्येही दुरावा आला होता. पती आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून शिवानी आणि सुमितचा सातत्याने वाद सुरू होता.

अशी केली चोरी

रोजच्या भांडणाला कंटाळून शिवानीने घरातच चोरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिवानीने लग्नापूर्वीच्या मित्रांना हाताशी धरले आणि घरातच चोरी करण्याचा कट रचला. शिवानीने घरात कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत याची संपूर्ण माहिती तिच्या मित्रांना व्हिडिओ काढून पाठवली होती. घटनेच्या दिवशी शिवानी पतीला जबरदस्तीने नातेवाईकाकडे घेऊन गेली होती. त्यानंतर चार तासानंतर जेव्हा यादव दाम्पत्य परत आले तेव्हा घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुमित यादवने चोरीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरातले सीसीटीव्ही तपासले असता दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात छत्री घेऊन घरात घुसल्याचे दिसले. दोघांनी कपाट उघडून तिजोरीतून सहा लाख रुपये रोख आणि काही सोन्याचे दागिने असा तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.

असा लागला चोरीचा छडा

पोलिसांनी चोरांची मोडस ऑपरेंडी पाहून आरोपींना घरातील संपूर्ण माहिती असल्याचं जाणवलं. त्यानंतर पोलिसांनी सुमितच्या पत्नीची सखोल चौकशी केली. पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा शिवानीने आपला गुन्हा कबुल केला आहे. लग्नापूर्वीच्या मित्रांच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे तिने सांगितले. चोरी करण्यापूर्वी घरातील कुठली वस्तू कुठे आहे या संपूर्ण बाबींची माहिती तिने तिच्या मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ काढून दिली होती. यातील एकाला अटक करण्यात आली आहे तर सदर पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. तर शिवानी यादव ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

प्रेमविवाहात झाला घात

सुमितने दहा वर्षांपूर्वी शिवानीसोबत प्रेम विवाह केला होता. मात्र या घटनेची उकल झाल्यानंतर मात्र त्याला जबर धक्का बसला आहे. कुटुंबीयांना झुगारून प्रेमविवाह केला असताना पत्नीने त्याच्यासोबत घात केल्याची भावना सध्या त्याच्या मनात घर करून बसली आहे. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही पाहून चोरांच्या हालचालीवरून ही चोरी घरातील संपूर्ण माहिती असलेल्या व्यक्तीची मी केल्याच्या निष्कर्षाच्या आधारावर पत्नीचे बिंग फोडण्यात यश मिळवले आहे.