आठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक

Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 12, 2023, 02:22 PM IST
आठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक title=

Sana Khan Death Case : नागपुरातील (Nagpur Crime) भाजप कार्यकर्ता सना खान (Sana Khan) यांच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील कुख्यात दारु माफिया आणि वाळू तस्कर अमित ऊर्फ पप्पू शाहू याला पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. अमित शाहूने (Amit Shau) त्याच्या मित्रासह मिळून सना खानची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी सना खानची हत्या करुन तिचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला होता. नागपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना जबलपूरवरुन नागपूर येथे आणले आहे. पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले आहे. पोलीस तपासात सना खान प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नागपूरमधील भारतीय जनता पक्षाची सक्रिय कार्यकर्ता सना खान हिचा खून झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सना खानच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र सना खान यांचा मृतदेह अद्याप जबलपूर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जबलपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नेमलं आहे. हिरन नदीच्या काठावरून पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली आहे.

भाजपा नेत्या सना खान 1 ऑगस्टला जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटायला गेली होती. अमितच्या घरीच ती मुक्कामी होती. त्यानंतर 2 ऑगस्टच्या दुपारपासून सना खान बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या आईने मानकापूर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. नागपूर पोलिसांनी शोध घेतला असता सनाचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी अमितकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अमित शाहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली. 

नेमकं काय घडलं?

अमित शाहूने सना खान हिच्याशी एप्रिल महिन्यात लग्न केले होते. मात्र अमित आधीपासूनच विवाहित होता. अमितच्या पत्नीला सनाशी असलेल्या पतीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती होती. त्यामुळे दोघांत वाद होत होते. त्यातच सना 1 ऑगस्टला अमितच्या घरी गेली होती. सना आणि अमित शाहू यांचे व्यावसायिक संबंध देखील होते. 2 ऑगस्ट रोजी पैशाच्या वादातून सना आणि अमित शाहू यांच्यात जोरदार वाद झाला. याच रागातून अमित शाहूने सनाची डोक्यात रॉड मारून हत्या केली. त्यानंतर अमितने राजेंद्र सिंगच्या मदतीने तिचा मृतदेह कारने नेऊन हिरन नदीत फेकून दिला. घरी परत आल्यानंतर अमितने जीतेंद्र गौडला कारची डिक्की स्वच्छ करण्यास सांगितले. त्यावेळी आपल्याला रक्ताचे डाग दिसले अशी कबुली जीतेंद्रने पोलिसांसमोर दिली होती.