जितेंद्र शिंगाडे, प्रतिनधी, झी मीडिया, नागपूर : तडीपार गुंडाचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी झाल्याने एका कुटुंबालाच स्वसंरक्षणार्थ कायदा हाती घेण्याची वेळ आली. त्यात झालेल्या झटापटीत हा गुंड जखमी झाल्यामुळे आता पोलिसांनी सामान्य कुटुंबावरच गुन्हा दाखल केलाय.
नागपूरच्या जयभीम नगरमधल्या गल्ली नंबर 3 मधली मध्यरात्रीही ही घटना घडली. या घटनेची दृष्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. अखिल वान्द्रेला नागपूरमधून तडीपार करण्यात आलं होतं. त्यामुळे तो वर्ध्यात होता. मात्र स्थानिक पोलिसांच्या वरदहस्तामुळे अखिल सातत्याने नागपुरातच फिरायचा. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला जुना हिशेब चुकता करण्यासाठी अखिलने त्याचे काका सुरेश वान्द्रे यांच्या घरावरच हल्ला केला.
स्वसंरक्षणासाठी वान्द्रे कुटुंबिय आणि शेजाऱ्यांनी मिळून अखिलला जोरदार विरोध केला. त्यात अखिल जखमी झाला. परिसरातले लोक आपल्यावर हल्ला करतील या भीतीने गुंडांनी तिथून पळ काढला.
जो गुंड नागपुरात तडीपार आहे तो नागपुरात सातत्याने फिरतो कसा? वस्तीत येऊन थेट घरावर हल्ला करण्याचं धाडस कसा करतो. नागपूर पोलीस काय केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का, गुंडाचा बंदोबस्त व्हायलाच हवा पण त्याच्यावर वरदहस्त ठेवणाऱ्या पोलिसांवरही कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.
या संदर्भात अजनी पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना विचारलं असता त्यांनी अखिल नागपुरातच असल्याचं मान्य केलं. मात्र त्यांनी या संदर्भात कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.
या घटनेनंतर अजनी पोलीस स्टेशनमध्ये सुरेश वान्द्रे, त्यांची पत्नी, मुलगा या तिघांना अटक करण्यात आलीय. कायदा त्याबद्दल योग्य ती कारवाई करेलच पण तडीपार गुंडावर पोलिसांनी वेळीच योग्य ती कारवाई केली असती तर एका सामान्य कुटुंबावर गुन्हा दाखल झाला नसता.