नागपूर आणि वर्ध्याची जगातल्या सर्वाधिक १० उष्ण शहरांमध्ये गणना

नवतप सुरु झाल्याने उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.

Updated: May 27, 2019, 06:45 PM IST
नागपूर आणि वर्ध्याची जगातल्या सर्वाधिक १० उष्ण शहरांमध्ये गणना title=

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : विदर्भात उन्हाचा एवढा तडाखा आहे की रविवारी नागपूर आणि वर्ध्याची जगातल्या सर्वाधिक दहा उष्ण शहरांमध्ये गणना झाली. दोन्ही शहरांचा पारा ४६ वर गेला होता. एप्रिलपासूनच विदर्भात पारा ४२-४४ वर गेला होता. पण आता नवतप सुरु झाल्याने उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.  

सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर नवतप सुरू होतं. या नक्षत्रात सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर खूप कमी होतं. त्यामुळे पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरणे नेहमीपेक्षा अधिक उष्ण असतात. 9 दिवस हे नवतप चालतं. पुढचे ९ दिवस विदर्भात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

या गोष्टींची काळजी घ्या.

१. कष्टाची किंवा घराबाहेरची कामं सकाळी किंवा संध्याकाळीच करा. 
२. घराबाहेर पडल्यावर सतत पाणी पीत राहा.
३. चेहरा सुती कपड्यानं झाका.
४. सैल आणि सुती कप़डे वापरा.
५. उघड्यावरचे, तळलेले पदार्थ खाऊ नका.
६. कुलर किंला एसीमधून थेट उन्हात जाऊ नका.

२ जूनपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे नागपूर आणि विदर्भासह सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे.