खुशखबर : 'या' कंपनीने तयार केला कोरोना टेस्ट किट, २ तासात मिळणार रिपोर्ट

कोरोनाशी लढाईत मोठं यश

Updated: Mar 25, 2020, 09:27 PM IST
खुशखबर : 'या' कंपनीने तयार केला कोरोना टेस्ट किट, २ तासात मिळणार रिपोर्ट title=

पुणे :  देशात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकताच मुंबईत पनवेलमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. परिणामी लोकांच्या मनात कोरोनाविषयी भिती असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारताने पहिल्यांदाच मेक इन इंडिया टेस्ट किट तयार केलं.  याच किटच्या मदतीने काही तासांमध्ये संशयित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे. पुण्याच्या मायलॅब्स (MyLabs)कंपनीने या उपयुक्त किटचा शोध लावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या किटला मंजूरी दिली आहे. 

लवकरच हा किट रुग्णांच्या तपासणीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा किट अत्यंत उपयुक्त ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचा धोका ओळखून या लॅबनं आधीच संशोधन सुरू केलं आणि अवघ्या सहा आठवड्यांत हे मेड इन इंडिया किट तयार केलं. 

फक्त २ तासांमध्ये मिळणार रिपोर्ट 
मायलॅब्सचे प्रमुख डॉ. वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार,  कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी साकारण्यात आलेला हा किट अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या किटची किंमत फक्त १ हजार २०० रूपये आहे.  या किटचं वैशिष्ट्य म्हणजे किटद्वारे फक्त दोन तासांच्या आत रिपोर्ट मिळतील. या किटच्या मदतीने एका वेळी जवळपास १ हजार रक्तांचे नमुने तपासू शकतो.

देशात करोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा आता ६०६ वर पोहोचला आहे. यांपैकी ५५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ४२ रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. गेल्या २४ तासात करोना बाधितांचा आकडा ८७ने वाढला आहे.