Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्व परीक्षा सोमवारपासून

Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ( Mumbai University ) 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.

Updated: Feb 5, 2023, 12:32 PM IST
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्व परीक्षा सोमवारपासून   title=

Mumbai University Exams : जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई विद्यापीठाने दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ( University Exams) सोमवारपासून सुरु होणार आहेत. (Mumbai University Exams will start from Monday) हिवाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना संपाचा फटका बसला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यानं परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.(Mumbai University Exam )

3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. तर पूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसारच सोमवारपासून पार पडतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाने आवश्यक त्या उपाययोजना करुन परीक्षा विहित वेळेत घ्याव्यात, अशी सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानेही केल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता परीक्षा 6 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार आहेत. तर  mu.ac.in या संकेतस्थळावर राहिलेल्या दोन तारखांच्या  (3 आणि 4 फेब्रुवारी)  पेपर्सचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. हिवाळी सत्राच्या परीक्षा विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पदांच्या भरतीसह विविध प्रलंबित  मागण्यांमुळे परीक्षेशी संबंधित सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठाने गुरुवारी एलएलबी, एलएलएम, एमए, एमएससी, एमकॉम आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या.   

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठातही आंदोलने करणाऱ्या बिगर कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. शुक्रवारी, महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एमयू आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (एसयूके) यांना त्यांच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचे निर्देश दिलेत, ज्या विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या.