मुंबई-लोणावळा रेल्वे मार्गावर मोक्याच्या ठिकाणी लोकलचा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड

Mumbai Local Signal Failure: आधीच पाऊस आणि त्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लोकल बिघाडाला सामोरे जावे लागते. कसाऱ्याजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल लोकल दीड तास उशीराने धावत आहेत. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 28, 2023, 03:49 PM IST
मुंबई-लोणावळा रेल्वे मार्गावर मोक्याच्या ठिकाणी लोकलचा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड title=
kalyan kasara railway down route closed

Mumbai Local Central Railway Latest Updates: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस कोसळतोय. मुंबईमध्ये ढगाळ हवामान आहे. अधून-मधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळतायत. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला आहे. परिणाम पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम जाणवू लागलाय. रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने तसेच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याण आणि कसारादरम्यान रेल्वे सेवा खोळंबली आहे. कसाऱ्याकडे जाणारा डाऊन मार्ग बंद झाल्याने विदर्भ एक्स्प्रेस आणि कसारा लोकल (Kalyan kasara Railway) अडकून पडल्या आहेत. परिणामी तब्बल दीड तास उशीरा गाड्या धावत आहेत. तसेच प्रवासी लोकलमध्ये सुमारे तासाभरापासून ताटकळत उभे असल्याचे पाहायला मिळाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार वासिंद स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. सिग्नल मिळत नसल्याने प्रवाश्यांना एक-एक तास ट्रेनमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतोय. तसेच उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर माती आल्यानं कसाऱ्याकडे जाणारा डाऊन मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ एक्स्प्रेस आणि कसारा लोकल किंवा दोन्ही गाड्या रखडल्या आहेत. 

वाचा : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर 

लोणावळा ते कर्जत दरम्यान क्रॉसिंग पॉईंट फेल

लोणावळा ते कर्जत दरम्यान क्रॉसिंग पॉईंट बिघडल्यामुळे  सिंहगड एक्स्प्रेससारख्या अनेक गाड्यांना फटका बसला. पळसदरी स्थानकाच्या अलिकडिल पॉइंट फेल झाला आहे. यामुळे दीड तासाहून अधिक वेळ वाहतूक खोळंबली होती.मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ते कर्जत दरम्यान पळसदरी स्थानकाजवळील क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूकीचा खोळंबा झाला होता. सिंहगड एक्स्प्रेस कर्जत स्थानकाच्या अलिकडे सुमारे दिड तास थांबली होता. परिणामी त्यामागून येणाऱ्या सर्व रेल्वेसेवांवर याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. सकाळच क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्तापाला सामारे जावे लागले. 

बिघाडाचे सत्र सुरुच

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रेल्वे सेवेवर परिणाम होतच असतो. त्यामुळे कामावर जाणाऱ्या किंवा कामावरुन निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा होत असतो. तर दुसरीकडे पावसामुळे रेल्वे स्थानकात पाणी साचल्यास  तसेच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यास रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. मुंबईत लोकलकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. या लोकलने दररोज 70 लाखांहून अधिक लोक प्रवास करत असतात. चोवीस तास धावणाऱ्या मुंबईकरांसाठी लोकल अत्यंत महत्त्वाची आहे. अगदी काही मिनिटांच्या विलंबामुळे प्रवाशांच्या ठरलेल्या सगळ्या कामांची घडी विस्कटत असते.