Gateway To Mandwa Ferry: पावसाळ्याच्या कालावधीत बंद असलेली मुंबई-गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. 1 सप्टेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळं गणेशभक्तांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अलिबाग येथे जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. रस्तेमार्गे अलिबाग गाठण्यासाठी खूप वेळ खर्ची पडतो. मात्र, या मांडवा-गेट वे सेवेमुळं अलिबागमध्ये पोहोचण्यासाठी अवघा 1 तास लागतो. त्यामुळं अनेक नागरिकांसाठी ही जलवाहतूक खूप फायद्याची ठरते.
जून ते ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीत पावसाचा जोर जास्त असतो. अशावेळी मांडवा- गेटवे जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळं मांडवा ते गेट वे जलवाहतूक सेवा रविवारपासून सुरू करण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज घेऊन दिवसाला एक ते दोन फेऱ्या होणार आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तीन महिने ही सेवा बंद होती. मात्र आता सेवा सुरू झाल्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात विशेषतः अलिबाग मुरुड तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पर्यटन हंगामाला ही चालना मिळणार आहे. हवामानाचा अंदाज घेवून मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. वातावरणाची स्थिती पाहूनच ही सेवा सुरू ठेवण्यात यावी अशा सूचना मेरी टाईम बोर्डाने वाहतूकदार संस्थांना दिल्या आहेत. गणपती बाप्पाचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळं अलिबागहून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना जलवाहतूक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. अलिबाग ते रस्तेमार्गे अंतर जास्त असल्याने वेळ जास्त लागत होता. तसंच, रोरो सेवेचे तिकिट जास्त असल्याने ती परवडत नाही. मात्र आता मांडवा- गेटवे सेवा सुरू झाल्याने प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.