जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहा

Mumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 27, 2024, 01:22 PM IST
जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहा title=
मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजमधील पहिला टप्पा सुरु होणार (प्रातिनिधिक फोटो)

Mumbai First Underground Metro: मुंबईकरांना येणाऱ्या काळात एका नव्या मार्गाने प्रवास करण्याची सुविधा मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.  कुलाबा ते सिप्झ मार्गावरील मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजमधील सिप्झ आणि वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सदरम्यानचा मार्ग सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबरच्या अखेरिसपर्यंत पूर्ण होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए ऐवजी थेट मुंबई मेट्रो रेल्वे निगमला 1163 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला शिंदेंच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेण्यात आला.

सरकार राहणार गँरेंटर

यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. सदर प्रकल्पाचं 98 टक्के काम पूर्ण झालं आहे. यासाठी एकूण 37 हजार 725 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी देण्यासाठी सादर करण्यात आलं होतं. मंत्रिमंडळाने कर्जासाठी एमएसआरडीसीला सरकारी गँरंटी देण्याचाही निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1 हजार 130 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी 215.80 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने जमीन तब्यात घेण्याआधीच 2 हजार 341 कोटी 71 लाख रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.

पुण्यासंदर्भातही मोठा निर्णय

मंत्रिमंडळाने पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पासाठी हाऊसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (हुडको) 5500 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठीचा एमएसआरडीसीचा प्रस्ताव मान्य केला आहे. एकूण 972 कोटी 7 हेक्टर जमिनीपैकी 535.41 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. सरकारने जमीन अधिग्रहणासाठी 1 हजार 876 कोटी 29 लाख रुपये उपलब्ध करुन दिले.

जुलैपासून सुरु होणार मुंबईतील अंडरग्राऊण्ड मेट्रो

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबईमधील जमिनीखालील पहिल्या मेट्रोची यशस्वीपणे ट्रायल रन घेतली आहे. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जुलै महिन्यापासून सेवा सुरु केली जाईल. मुंबईमधील वाहतुककोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून हा प्रकल्प फारच प्रभावी ठरेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

अंडरग्राऊण्ड मेट्रोचा मार्ग कसा?

मुंबईतील या पहिल्या अंडरग्राऊण्ड मेट्रो प्रोजेक्टमध्ये 33.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. हा मार्ग आरे कॉलिनीपासून सुरु होणार आहे. यामध्ये एकूण 27 स्टेशन असणार आहेत. यापैकी 26 स्टेशन जमिनीखाली असणार आहे. 2017 मध्ये मेट्रोच्या या भुयारी मार्गाचं काम सुरु झालं. मात्र कोरोनामुळे या कामाला फटका बसला. एकूण 56 किलोमीटरच्या मार्गावर खोदकाम करुन मार्ग तयार करण्याचं नियोजन आहे. या मार्गावरील पहिला टप्पा हा आरे कॉलिनी ते बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) दरम्यानचा आहे.

(Mumbai Metro Line 3 Route Map (MMRCL))

हाच पहिला टप्पा जुलैमध्ये सुरु होणार आहे.