मुंबई : ऎन दिवाळीच्या धावपळीत पगारवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मध्यरात्रीपासून संपाला सुरूवात झाली आहे. राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झालीय.
मुंबईत परळ डेपोतून तसेच पुण्याच्या स्वारगेट डेपोतून मध्यरात्री सुटणाऱ्या गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत.
वेतनवाढीच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी सोमवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र या बैठकीनंतरही समाधान न झाल्याने कर्मचारी संघटना संपावर ठाम राहिल्या आहेत.
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपकाळात सर्व खासगी प्रवासी बस, शालेय बस, खासगी बस व मालवाहू गाड्यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे.