12 जिल्ह्यातील देवस्थांनाना जोडणारा 'शक्तिपीठ' महामार्ग; नागपूर ते गोवा 11 तासांत पोहोचणार

Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात येत आहे. 12 देवस्थांनाना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2024, 11:57 AM IST
12 जिल्ह्यातील देवस्थांनाना जोडणारा 'शक्तिपीठ' महामार्ग; नागपूर ते गोवा 11 तासांत पोहोचणार title=
MSRDC completes shaktipeeth expressway land acquisition survey

Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) दोन टप्प्यात सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू होणार आहे. त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)ने बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि गोवा (Nagpur-Goa) जोडणाऱ्या आगामी शक्तिपीठ एक्स्प्रेसवेसाठी भूमी अधिग्रहणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवीन नागपूर - गोवा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून 800 किमी लांबीचा असणार आहे. 

देवस्थाने जोडली जाणार

MSRDCने दिलेल्या माहितीनुसार, नवीन नागपूर-गोवा महामार्ग दोन्ही शहरात थेट कनेक्टिव्ही निर्माण करणार आहे. या महामार्गामुळं 21 तासांचा वेळ कमी होऊन 11 तासांवर होणार आहे. म्हणजेच नागपूरहून गोवा गाठणे आता 11 तासांत शक्य होणार आहे. या महामार्गाचे दुसरे वैशिष्ट्यै म्हणजे, हा माहामार्ग 12 जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणार आहे. यात दोन ज्योतिर्लिंग आहेत. एक म्हणजे परळी वैजनाथ आणि दुसरे हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर) यांचा समावेश आहे. 

पर्यटनाला चालना मिळणार

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यातील जागृत देवस्थान या महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा मंदिरांना हा महामार्ग जोडण्यात येणार आहे. या महामार्गाचे एक उद्देश म्हणजे, पर्यटन क्षेत्रांचा विकास आणि या पर्यटनाला चालना देणे हे आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 86,000 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. 

12 जिल्हे कोणते?

शक्तिपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गापेक्षाही अधिक लांबीचा आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. 

पवनार-येला ते गोवा-पात्रादेवी असा हा महामार्ग असून या मुळं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणातील काही शहरांतून व गावांतून जाणार आहे. विशेष म्हणजे या मार्गातील अनेक देवस्थांनानादेखील तो जोडणार आहे. या महामार्गाचे आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच भूमी अधिग्रहणाचे काम सुरू करुन योग्य तो मोबदला दिला जाणार आहे.