MP Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत अशी लढत येथे पाहायला मिळाली. दोघेही तुल्यबळ नेते असल्याने कोण निवडून येणार? याबद्दल साशंकता होती. पण नारायण राणेंनी येथे विजय मिळवला. राणे खासदार म्हणून निवडून आले खरे पण आता खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला, असा आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय. राऊतांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला राऊतांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) असा सामना रंगताना दिसणार आहे.
नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. राणेंनी मते विकत घेतली तसेच मतदारांना धमकावून विजय मिळवलाय. हा विजय रद्द करावा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विनायक राऊतांनी याचिकेतून केली आहे.
नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक गैरप्रकार केल्याचे राऊतांनी सांगितले.
राणेंविरोधात आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचे राऊतांनी म्हटले आहे. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. विनयकुमार खातू, अॅड. श्रीया आवळे, अॅड. किशोर वारक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. याचिकेत नारायण राणे यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.