Monsoon and Cyclone Biparjoy Updates : मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला आहे. वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मान्सून तळकोकणात दाखल (Monsoon in Konkan) झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल आणि 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. (Rain in Mumbai and Pune)
मराठवाडा, विदर्भाला मात्र पावसासाठी आणखी वाट पाहावी लागेल. सोमवारी मान्सून तळकोकण, कर्नाटक, तामिळनाडूत आला. तर बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनने पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारपर्यंत मजल मारली. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे गुजरात, मुंबई आणि केरळजवळील समुद्र परिसरात उंच लाटा उसळू लागल्या आहेत.
अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चालले आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. अरबी समुद्रात सुरु झाले चक्रीवादळ 'बिपरजॉय' 14 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळील मांडवी ओलांडू शकते. त्याचप्रमाणे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराचीच्या पलीकडे प्रवेश करु शकते, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
गुजरात सरकारसह एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजन्सींना यामुळे झालेल्या नुकसानीचा सामना करण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, 15-16 जून रोजी पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ राहू शकते आणि काही भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो.
'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे गुजरात, मुंबई आणि केरळजवळील समुद्र परिसरात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळांचा जोर वाढत असून, त्यामुळे हजारो लोक प्रभावित होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य वारे राजस्थान आणि दक्षिण हरियाणा ओलांडून दिल्लीला पोहोचतील, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडेल. मात्र, हा दिलासा तात्पुरता असेल आणि मान्सूनच्या आगमनापर्यंत उत्तर भारतातील लोकांना उष्णतेचा आणि आर्द्रतेचा सामना करावा लागणार आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.