कौतुकास्पद ! रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपरिषदेला दिला व्हेंटिलेटर

अंबरनाथच्या मोहन कुलकर्णी यांचा नवा आदर्श. पैसे कमी पडल्याने बँकेतून कर्ज घेऊन टाकली भर. तब्बल साडे सहा लाखांचा व्हेंटिलेटर अंबरनाथ पालिकेला सुपूर्द

Updated: Apr 28, 2021, 06:34 PM IST
कौतुकास्पद ! रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपरिषदेला दिला व्हेंटिलेटर  title=

अंबरनाथ : सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत ऑक्सिजन, इंजेक्शन, व्हेंटिलेटर अशा सगळ्याची कमतरता भासत असताना अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला एक व्हेंटिलेटर दान केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पालिकेत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी सोहळ्यात हा व्हेंटिलेटर नगरपालिकेला प्रदान करण्यात आला. 

मोहन कुलकर्णी हे सेवानिवृत्त अंबरनाथकर आहेत. बोरॅक्‍स मोरारजी कंपनीत त्यांनी तब्बल ४० वर्ष नोकरी केली. 2003 साली कुलकर्णी हे निवृत्त झाले आणि त्यानंतर मुंबईला वास्तव्याला गेले. 2019 साली दुर्दैवाने कुलकर्णी यांच्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर कुलकर्णी यांना आरोग्य सेवेसाठी काहीतरी योगदान देण्याची मनापासून इच्छा होती. त्यातच सध्याची आणीबाणीची परिस्थिती पाहता कुलकर्णी यांच्याकडे जमा असलेल्या पुंजीतून अंबरनाथ पालिकेला एखादी रुग्णवाहिका घेऊन द्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. 

पण सध्या रुग्णवाहिकेची गरज नसून एखादा व्हेंटिलेटर त्याच पैशातून देता आला तर बघा, असं मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सुचवलं. हा निरोप कुलकर्णी यांच्याकडे पोहोचला. मात्र कुलकर्णी यांच्याकडे व्हेंटिलेटर घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी दीड लाख रुपये बँकेतून कर्ज घेतलं आणि त्यांच्याकडे असलेल्या जमापुंजीत भर टाकून अंबरनाथ नगरपालिकेला तब्बल साडेसहा लाख रुपयांचा नवाकोरा व्हेंटिलेटर घेऊन प्रदान केला. 

हा व्हेंटिलेटर अंबरनाथ नगरपालिकेच्या डेंटल कॉलेज कोव्हीड केअर सेंटरमध्ये नेण्यात येणार असून त्याचा अंबरनाथमधील रुग्णांना फायदाच होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी सोहळ्यामध्ये कुलकर्णी यांनी हा व्हेंटिलेटर अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना सुपूर्द केला. यावेळी ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावे अशा व्यक्ती फार कमी उरल्या असून त्यापैकीच एक मोहन कुलकर्णी असल्याचे गौरवोद्गार अंबरनाथ नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी काढले. 

आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो, याच भावनेतून अंबरनाथकरांसाठी आपण ही मदत केल्याचं यावेळी मोहन कुलकर्णी यांनी सांगितलं.