मोहन भागवत - नितीन गडकरी दिसणार एकाच मंचावर

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत आणि नितीन गडकरी यावेळी बोलतात याबाबत उत्कंठा शिगेला 

Updated: Nov 6, 2019, 08:09 PM IST
मोहन भागवत - नितीन गडकरी दिसणार एकाच मंचावर  title=

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय रस्सीखेचाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी नागपुरातील एका कार्यक्रमात एकत्र येताहेत. स्थानिक सायंटिफीक सभागृहात आयोजित जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येत आहेत. त्यामुळे भागवत आणि गडकरी काय बोलतात? याबाबत उत्कंठा शिगेला गेलीय. 'जिव्हाळा' पुस्तक विमोचन या कार्यक्रमात मोहन भागवत आणि नितीन गडकरी एकाच मंचावर दिसणार आहेत.


भागवत - गडकरी एकाच मंचावर

मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या युतीतल्या तिढ्यादरम्यान बुधवारी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतलेली नितीन गडकरींची भेटही खास ठरली. महाराष्ट्राच्या सत्ताचर्चेबद्दल किंवा राजकीय भेट नव्हती तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्यावर आपण नितीन गडकरींची भेट घेतल्याचं अहमद पटेल सांगत असले तरी राज्यातल्या सत्तापेचासंदर्भात राजकीय हालचाली दिल्लीतही सुरू असल्याचंच या घटनेनं अधोरेखित केलं.  

दुसरीकडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या अर्थात गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, आज वर्षा बंगल्यावर पुन्हा भाजपा कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली. भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांना सत्तास्थापनेसाठी जनादेश मिळाल्याचं सांगतानाच 'लवकरच गोड बातमी मिळेल', असं सूचक वक्तव्यही सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. मुनगंटीवारांच्या या वक्तव्यावर 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हीच गोड बातमी सुधीर मुनगंटीवारच देईल' अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेच्या संजय राऊतांनी दिलीय.