केंद्रात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार; मोदींच्या मंत्रिमंडळात आता 3 मंत्रीपदे?

Modi Government Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या तीन चेहऱ्यांना स्थान मिळणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आले आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 30, 2023, 10:10 AM IST
केंद्रात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार; मोदींच्या मंत्रिमंडळात आता 3 मंत्रीपदे? title=
(फोटो सौजन्य - PTI)

Modi Government Cabinet Expansion : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक बोलवल्याने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची (Cabinet Expansion) चर्चा सुरू झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीपूर्वी होणारा मोदींच्या मंत्रिमंडळाचा अखेरचा फेरविस्तार असणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्ली दौरा केला आहे. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shash) यांची भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लवकरच शिंदे गटातील काही खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा आणि पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार व भाजप संघटनेत येत्या काही दिवसांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खराब कामगिरी असलेल्या 12 पेक्षा जास्त मंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या 12 मंत्र्यांच्या जागी नव्या 12 चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच या फेरबदलामध्ये शिंदे गटातील तिघांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटातील तिघांना (एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री) स्थान देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद येणार, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र कुणाला मंत्री करायचं हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळते आहे. एनडीए मजबूत आहे हा संदेश देण्यासाठी केंद्रात शिंदे गटाला तीन मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पदे असा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र आता शिंदे गटाला 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील मंत्रीमडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे. तसेच येत्या पंधरवड्यात भाजप संघटनेत मोठे बदल करणार आहे. यासोबत कित्येक दिवस चर्चेत असलेल्या समान नागरी कायद्यासंदर्भात येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात वातावरण निर्मिती करणार आहे. त्या दृष्टीनेदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे