'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला

Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2024, 11:15 AM IST
'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला title=
राऊत यांनी साधला निशाणा

Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ अर्थात एनडीए) सरकारचा शपथविधी रविवारी नवी दिल्लीमध्ये पार पडला. वाराणीसतून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा बहुमान मोदींनी मिळवला. मोदींबरोबरच एनडीएच्या एकूण 64 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाच्या स्वतंत्र कारभार असलेलं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्रातून कोणाकोणाला मिळाली संधी?

शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातून एकूण सहा जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं असून त्यामध्ये भाजपाच्या चार खासदारांचा समावेश आहे. रपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपाचे ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरींबरोबरच पियुष गोयल यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. रावेरच्या खासदार रक्षा खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर पुण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढून खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाला भाजपाने राज्यमंत्रिपद देऊ केलं होतं. मात्र अजित पवार गटाने कॅबिनेट मंत्रिपदाचा हट्ट धरत सध्या देऊ केलेलं मंत्रिपद नाकारलं असून पुढील विस्तारात अजित पवार गटाच्या मागणीबद्दल विचार केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील खासदारांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीनंतर ठाकरे गटाने शिंदेंवर निशाणा साधला आहे.

'...पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद'

संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधताना, "हे भाजपाचे गुलाम आणि आश्रयित लोक आहेत. ते काय करणार? स्वाभिमान असता तर त्यांनी राज्यमंत्री पद नाकारलं असतं. अजित पवारांनी राज्यमंत्रीपद नाकारलं. जीतनराम मांझी यांचाही एकच खासदार आहे पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं आहे. मात्र महाराष्ट्राच्या लोकांना काही मिळालेलं नाही. ही त्यांची मजबुरी आहे. हा त्यांचा विषय आहे, त्यावर मी फारसं बोलणार नाही," असं पत्रकार परिषदेत म्हटलं.

नक्की वाचा >> 'मोदींनी शपथ सोहळ्याचा थाट केला जणू काही..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तरी स्वतःचे झाकून..'

विक्रम करायचा म्हणून शपथ...

राऊत यांनी मोदींना विक्रम नावावर करायचा होता म्हणून त्यांनी शपथ घेतल्याचा टोलाही लगावला. "कॅबिनेट तयार झालं आहे. हे कॅबिनेट किती दिवस चालेल सांगता येणार नाही. जी परिस्थिती आहे, जी माहिती समोर येत आहे ती पाहता गडबड दिसत आहे. मोदींना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची होती. एक विक्रम आपल्या नावावर करायचा होता, तो त्यांनी केला. आता किती दिवस किती सत्ता खेचतात हे पाहूयात. मात्र या ओढाओढीत देशाचं नुकसान होणार आहे," असं राऊत म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> 'खडसेंचं मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी..', मोदींऐवजी 'या' नेत्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचा टोला

कमी खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रिपद

शिंदे गटाचे सात खासदार असूनही त्यांना एक राज्यमंत्रिपद देण्यात आलेलं असतानाच दुसरीकडे कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेली आहेत.