राज ठाकरे यांना ‘खाज ठाकरे’ म्हणणाऱ्या मिटकरींना मनसेचे जशासतसे प्रत्युत्तर, तेव्हा चड्डीत राहायचे..

Amol Mitkari criticizing on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्यात वातावरण कमालीचे तापले आहे. तसेच राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.  

Updated: Apr 21, 2022, 08:11 AM IST
राज ठाकरे यांना ‘खाज ठाकरे’ म्हणणाऱ्या मिटकरींना मनसेचे जशासतसे प्रत्युत्तर, तेव्हा चड्डीत राहायचे.. title=
संग्रहित छाया

मुंबई : Amol Mitkari criticizing on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्यात वातावरण कमालीचे तापले आहे. तसेच राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या सभेला विरोध होत आहे. तर काहींनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडूनही राज ठाकरे यांचा समाचार घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना ‘खाज ठाकरे’ म्हटले आहे. त्यानंतर मनसेकडूनही जशासतसे प्रत्युत्तर आले आहे. मनसेकडून खोचक टीका करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत 'राष्ट्रवादीची मटण करी' असा उल्लेख केला आहे.

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळावा घेतला. त्यावेळी पुढे पुढे काय होते ते बघा, असा इशारा दिला होता. त्यानंतर 12 एप्रिल रोजी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मांडलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण सुरु झाले आहे. तुमचा भोंगा तर आमची हनुमान चालीसा, असे सांगत भोंग्याविरोधात दंड थोपटलेत. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी हनुमान चालीसा वाजवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख 'खाज ठाकरे' असा केला आहे. त्यावरुन राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मनसेकडून प्रतिटोला लगावण्यात आला आहे.

इस्लामपूरच्या सभेत बोलताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना एका दमात हनुमान चालीसा म्हटल्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. याच सभेमध्ये अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाढती महागाईवर ते बोलत नाहीत. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाइमपास होत आहे. साहेबांवर (शरद पवार) बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिले, असा टोला त्यांनी लगावला.

मनसेकडून अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

दरम्यान, मनसेकडून अमोल मिटकरी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संदीप देशपांडे यांनी मिटकरी यांचे नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत ट्वीट केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये 'राष्ट्रवादीची मटण करी' असा उल्लेख केला आहे.

राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून. ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा चड्डीत राहायचे, काय समजलं?” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.