राज ठाकरेंनी दंड थोपटले, म्हणाले 'धोंडा पाडून घेणार नाही, त्यामुळे...'; शरद पवार-अजित पवार भेटीनंतर केली भविष्यवाणी

MNS Raj Thackeray: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि अजित पवार भेटीवरही भाष्य केलं.   

शिवराज यादव | Updated: Aug 14, 2023, 12:35 PM IST
राज ठाकरेंनी दंड थोपटले, म्हणाले 'धोंडा पाडून घेणार नाही, त्यामुळे...'; शरद पवार-अजित पवार भेटीनंतर केली भविष्यवाणी title=

MNS Raj Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाची आग अद्यापही धुसफूसत असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा रंगली आहे. पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भेटीवर भाष्य केलं असून चोरडिया नावावरुन टोला लगावला आहे. 

मनसेची आज वांद्रे एमआयजी क्लब येथे बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय करणार मार्गदर्शन याकडे सर्वांचं लक्ष होतं. 

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सांगितलं की, "आजची बैठक आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडुकांसंदर्भात होती. पालिका निवडणुका यावर्षी होतील असं वातावरण मला दिसत नाही. महाराष्ट्रात जो काही राजकीय घोळ सुरु आहे, तो पाहता पालिकेच्या निवडणुका जाहीर करतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकाच होतील. त्याच पार्श्वभूमीवर सर्व मतदारसंघांची चाचपणी होईल. प्रत्येक मतदारसंघात आमच्या टीम जातील आणि त्यादृष्टीने काम करतील. तिथे काय काम करायचं हे सांगितलं आहे. जी लोकं पाठवायची आहेत. त्यांच्यासाठी ही बैठक होती. उद्या त्यांच्या हातात संपूर्ण कार्यक्रम असेल. त्याप्रमाणे ते आपापल्या मतदारसंघात रुजू होतील". 

दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी सांगितलं की, "परवा पनवेलला माझा मेळावा होणार आहे, तिथे मी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात बोलणार आहे". मी कोणालाच पाहत नाही. आमचं आमचं काम सुरु आहे असं सांगत राज ठाकरेंनी युतीच्या चर्चेचा फेटाळल्या. 

शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी आधीच सांगितलं होतं ना, एक टीम पाठवली आहे आणि दुसरी टीम नंतर जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. 2014 पासून हे एकत्र आहेत. तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर झालेल्या गोष्टी आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना चोरडिया येथे बैठकीची जागा मिळाली हे पण विशेष आहे". 

मनसेचा 'एकला चलो रे'चा नारा आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले "तुम्हाला काय वदवून घ्यायचं आहे. परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तर तुम्हाला सवयही झाली आहे. दोन दिवासंपूर्वी काय बोललं जातं आणि नंतर काय होतं हे सर्वांना माहिती आहे. पण महाराष्ट्राची जास्तीत जास्त प्रताडणा होणार नाही याची जास्त याची काळजी घेतली आहे. आधीही घेत होता आणि घेत राहू".