कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे. पावसामुळे खड्ड्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहे.
आज आमदार राजू पाटील यांनी कल्याणमधील चक्की नाका ते नेवाळी रस्त्याची पाहणी केली. यावेळी पालिका अधिकारी देखील उपस्थित होते. रस्त्यांची अवस्था पाहून राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
सहनशीलतेचा अंत झालाय, 15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू असा दम आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांना भरला आहे. आमदार राजू पाटील यांनी यावेळी पालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर ही टीका केली आहे.
तब्बल 114 कोटी खर्च करुन ही खड्डे भरले गेलेले नाहीत. रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. नागरिकांना प्रवास करताना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.