फडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला

Raj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2024, 05:51 PM IST
फडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला title=
पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं भाष्य

Raj Thackeray On Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकला चलो रेची भूमिका घेतली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आपण 200 ते 250 जागांसाठी तयारीला लागलं पाहिजे असं म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे पदाधिकारी बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केल्याची माहिती समोर येत असून राज ठाकरेंनी आपण कोणत्याही पक्षाकडे जागा मागण्यासाठी तसेच जागावाटपाची चर्चा करण्यासाठी जाणार नसल्याचे संकेत दिल्याचे समजते.

उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदींविरोधातील मतदान

"लोकसभा निवडणुकीत मनसैनिकानी चांगलं काम केलं म्हणून राज्यात महायुतीला चांगलं यश आले," असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंना झालेलं हे मतदान मोदीविरोधातील मतदान आहे, असंही राज यांनी म्हटलं. "राज्यातील फोडाफोडीचे राजकारण लोकांना आवडलं नाही. मोदी नको म्हणू (अँटी  मोदी) काहींनी महविकास आघाडीला मतदान केलं," असंही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या भाषणात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, "स्वबळावर 225 ते 250 जागा लढवण्यास तयार रहावे," असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

मराठी माणूस आपली वाट पाहतोय

तसेच या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नसल्याचंही म्हटल्याचं समजतं. "मराठी माणूस आपण कधी रिंगणात उतरतोय याची वाट पाहतोय," असं म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जनता मनसेची वाट पाहत असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग असल्याचं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

नक्की वाचा >> 'महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कोणावर समजून घ्या', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'

जागावाटपाच्या चर्चेत रस नाही

राज ठाकरेंनी जागावाटपासंदर्भात सूचक पद्धतीने भाष्य केल्याची माहितीही समोर येत आहे. मी कोणापुढेही जागा मागायला जाणार नाही. सध्या कुठल्याच पक्षाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, असं म्हणत राज यांनी महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात अद्याप अनिश्चितता असल्याचं सूचित केल्याचे समजते. जागावाटपासंदर्भाती संभ्रमाचा उल्लेख करत राज ठाकरेंनी मी तुम्हाला आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हेच सांगू शकतो असं म्हटलं. आपण 225 ते 250 जागा लढत आहोत, असं राज पदाधिकाऱ्यांसमोर म्हटल्याचं समजतं. 

...म्हणून स्वबळाचा नारा?

राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. मात्र आता जागा वाटपामध्ये राज यांच्या वाट्याला कमी जागा येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचे 105 आमदार आहेत. शिंदे गटाचे 40 तर अजित पवार गटाचेही तितकेच आमदार असल्याने जागा वाटपामध्ये राज ठाकरेंच्या वाट्याला फारच कमी जागा येतील असा अंदाज बांदला जात असल्याने राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मार्ग चाचपडून पाहत असल्याचे समजते.