MPSC परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Updated: Apr 9, 2021, 11:34 AM IST
MPSC परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी title=

मुंबई : MPSC ची परीक्षा रविवारी 11 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती नुकतीच राज्य सरकारकडून देण्यात आली होती. याआधी या परिक्षेची तारीख पुढे ढकलण्यात येणार होती. पण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा विरोध पाहता परीक्षा 11 एप्रिल रोजीच होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

11 एप्रिल रोजी एमपीएससीची परीक्षा आहे. मात्र अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात 'झी 24 तास'ला माहिती दिली.  

गेले काही दिवस MPSC परीक्षेच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापले होते. यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात होती.  MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटलंय. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन आपला राग व्यक्त केला. विरोधी पक्षाने देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. 

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.