राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने जय मालोकारचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याला वेगळं मिळालं असून खळबळ उडाली आहे.
जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता होता. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना सुपारीबहाद्दर म्हटलं होतं. राज ठाकरेंनी अजित पवार नसतानाही पुण्यातील धरण भरलं असं उपहासात्मकपणे म्हटल्यानंतर अमोल मिटकरी यांनी ही टीका केली होती. मात्र ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता.
अमोल मिटकरी अकोल्यात विश्रामगृहात असताना मनसैनिक तिथे पोहोचले होते आणि बाहेर उभी कार फोडली होती. यावेळी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे जयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला होता.
जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. जय मालोकारच्या मृत्यूनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राज ठाकरे अकोला दौऱ्यावर असताना कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. अमोल मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला होता.
दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी जय मालोकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळेच त्याच्यासोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय व्यक्त केला होता. शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या राड्यानंतर जय मालोकारसोबत कोण होते? हे समोर आले तर या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक सत्य बाहेर येईल. अकोला पोलिसांनी या सगळ्या गोष्टींचा तपास करावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली होती.