रत्नागिरी : सतत कोसळणाऱ्या पावसाचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धारणा लगतच्या पाण्याच्या सांडव्याची संरक्षण भिंत कोसळल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच सततच्या पावसामुळे चांदेराई तसेच सोमेश्वर येथे खाडीचे पाणी लोकवस्तीत येऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले आहेत. संबंधीत यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त घटनास्थळांना भेट दिल्यानंतर आमदार सामंत यांनी या सूचना केल्या.
शिळ धरणाच्या बाजूला असलेल्या सांडव्याच्या जवळच्या डोंगरात भेगा पडायला सुरुवात झाली होती. यासाठी उपाययोजना म्हणून संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. पण गेल्या दोन दिवसाच्या सलग पावसामुळे डोंगरात भेगा जाऊन त्याची माती सांडव्याच्या दिशेने सरकू लागली होती.
यानंतर सांडव्याच्या डाव्या बाजूची 70 मीटर लांबीची संरक्षक भिंत पूर्णपणे कोसळल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भात तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश सामंत यांनी दिले आहेत.
शीळ धरणालगत नवी संरक्षण भिंती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, माजी जि.प.उपाध्यक्ष राजेश मुकादम, विभागप्रमुख विजय देसाई, जलसंपदा विभागाचे ए.सी.श्री.दाबाडे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
चांदेराई येथे पुराचे पाणी ओसरल्यावर तात्काळ नुकसानग्रस्त भागांचे तेथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पंचनामे करावे अशा सूचना आमदार उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत.