Santosh Bangar Controversy: विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी केलेल्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या कोणत्याही गटाचे आमदार अपात्र न ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला. यामुळे दोन्हीकडच्या आमदारांना दिलासा मिळाला. अशातच एकनाथ शिंदेंच्या आमदाराने एक मोठी घोषणा केली आहे. 2024 ला मोदी पंतप्रधान नाही झाले तर भरचौकात फाशी घेणार असल्याचे मोठ विधान शिंदे गटाच्या आमदाराने केलं आहे.
24 जून 2022 ला हे आमदार उद्धव ठाकरेंसाठी रडले होते. काहीही झाले तरी मी शिंदे गटात जाणार नाही. मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहीन. मी गद्दार नाहीय असे सांगताना ते ढसाढसा रडले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच म्हणजे 4 जुलै 2022 ला उद्धव ठाकरेंविरोधात गेले आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे 11 जुलै 2022 ला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. तुम्ही बरोबर ओळखलात. आपण बोलतोय आमदार संतोष बांगर यांच्याबद्दल. बांगर यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करुन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. असं नेमकं काय म्हणाले बांगर हे सविस्तर जाणून घेऊया.
एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच मूळ शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला. यानंतर राज्यभरातील शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. असाच उत्साह हिंगोली जिल्ह्यातही पाहायला मिळाला. येथे संतोष बांगर यांनी उत्साहाच्या भरात मोठं विधान केलं. ते विधान जसंच्या तसं जाणून घेऊया. २०२४ ला ठामपणे… छाती ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की, निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आजही मी तुम्हाला सांगतो… आता एप्रिलमध्ये येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे, छाती ठोकून सांगतो की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार. जर नरेंद्रभाई या देशाचे पंतप्रधान झाले नाही, तर हा संतोष बांगर भर चौकात फाशी घेईन. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाल्याशिवाय राहणार नाही' असे बांगर म्हणाले.
वादग्रस्त विधान करण्याची बांगर यांची पहिलीच वेळ नाही. ज्यांनी शिवसेनेसोबत बेइमानी केली त्यांच्यावर त्यांचा बायकासुद्धा भरोसा करणार नाही असे विधान त्यांनी शिंदे गट वेगळा झाल्यावर केले होते. शिवसेना सोडून गेलेल्यांची तमुलं सुद्धा अविवाहित ( मुंजे) मरणार आहेत असे वादग्रस्त विधान बांगर यांनी केले होते. या विधानानंतर उद्धव ठाकरे समर्थकांनी बांगरांना डोक्यावर उचलून घेतले. त्यांचा जाहीर सत्कार केला. पण काही दिवसातच ते शिंदे गटात गेल्याचे सर्वांनी पाहीले.