Political News : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर सगळी राजकीय समीरणं 360 अंशांनी फिरली. पाहता पाहता परिस्थिती बदलली, राजकीय पटलावर अनेक चाली चालल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे राज्याच्या विराजमान झाले. शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या फळीनं पक्षात बंड करत शिंदेंना साथ दिली, त्या क्षणापासून आमदार अपात्रतेचा मुद्दा डोकं वर काढत राहिला. अखेर हे प्रकरण निकाली निघालं आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वच आमदारांना पात्र ठरवत शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. (Eknath Shinde Uddhav Thackeray)
दरम्यान, इथं अतिशय महत्त्वाचा निकाल जाहीर झालेला असतानाच तिथं थेट उद्धव ठाकरे यांनाच शिंदे गटाकडून बोलावणं आल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरेंनाच शिंदे गटाची ऑफर दिली कोणी? असा प्रश्न अनेकांना पडला आणि त्याचंही उत्तर समोर आलं.
सत्ता संघर्षाचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही लोकशाहीची हत्या आहे, राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निर्लज्जपणाचा कळस गाठलाय असं वक्तव्य करत जळजळीत टीका केली. ज्यानंतर या प्रकरणावर कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी नजरा वळवणारं वक्तव्य केलं.
सत्तासंघर्ष आणि आमदार अपात्रता निकालाविषयीचा प्रश्न विचारला असता, 'साहेब आता बस झालं ओ, तुमच्या आजुबाजूला असलेले चेले चपाटे तुम्हाला सुधरू देत नाहीयेत, यांना बाजूला करा...' असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
'संजय राऊत यांनीच सगळा सत्यानाश करून टाकला, यांनी सगळी शिवसेना शरदचंद्र पवारांच्या खुट्याला नेऊन बांधली, यांनी काहीच ठेवलं नाही, म्हणून मला वाटतंय साहेब आजही वेळ गेली नाही, बाळासाहेब म्हणाले होते मला एका दिवसाचा पंतप्रधान करून दाखवा मी राम मंदिर बांधेन, आज तर येत्या 22 तारखेला साक्षात रामाचं आगमन होत आहे, त्यामुळे अजून वेळ गेलेली नाहीये, आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात असंच मला आजही वाटतंय, त्यामुळं आपण इकडं (शिंदे गटात) जर आलात तर लोक समजून घेतील, पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विचार आपणही आपल्या हृदयात रुजून घ्यावेत हीच आपल्याला विंनती करतोय', असा सूर बांगर यांनी आळवला.
बांगर यांच्या या वक्त्व्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा काही बदल दिसणार का? आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असेल? असेच प्रश्न उपस्थित राहिले आहेत.