Maharashtra Politics : राज्यात शिंदे - भाजप सरकार सत्तेत आहे. मात्र, शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सर्व्हेच्या जाहिरातीवरुन झालेला हा वाद मिटवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा नवी जाहिरात दिली. आजच्या जाहिरातीत फोटोंपासून टक्केवारीपर्यंत सर्वंचं नव्यानं छापण्यात आल. शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु असताना हा वाद आणखी पेटल्याचे दिसत आहे. सर्व्हेची जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजप खासदाराने शिंदे गटावर कडडाडून टीका केली. यानंतर शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली आहे. तर, शिंदे गटासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडूही चांगलेच भडकले आहेत.
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही असा टोला बोडेंनी लगावला आहे. तर, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी थेट भाजपची औकात काढत पलटवार केला आहे. आमदार बच्चू कडू यांनीही या टीकेला उत्तर दिले आहे. बोंडे अशी टिका करत असेल तर दुर्दैव आहे. बेडूक कोण आहे हे येणाऱ्या काळात समजेल तसेच बोंडेच्या या वक्तव्याचा निषेध करतो. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. तुम्ही शिंदे साहेबांना बेडूक म्हणत असाल तर तुम्ही शिंदे साहेबांशीवाय फुगले नसते वेळ आल्यानंतर बोंडेना योग्य उत्तर देऊ अशी टीका बच्चू कडू केली आहे.
शिंदे गटाकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या जाहिरातीत केंद्रात मोदी, राज्यात शिंदे असा उल्लेख करण्यात आला. हा उल्लेख म्हणजे शिंदेंचं वर्चस्व दाखवण्याचा आणि फडणवीसांना कमी लेखण्याचा प्रकार असल्याची कुजबूज सुरु झाली. त्यामुळे शिंदे गटाकडून आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या जाहिरातीत शिंदे आणि फडणवीसांचा एकत्र फोटो छापण्यात आलाय. तसंच जाहिरातीत मोदी शाहांसह बाळासाहेब आणि दिघेंचाही फोटो आहे. जनतेचा कौल शिवसेना भाजप युतीलाच असंही जाहिरातीत म्हटलंय. डॅमेज कंट्रोलसाठीच ही नवीन जाहिरात देण्यात आल्याची चर्चा आहे.
शिंदेंच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. दरेकर, बावनकुळे अशा दिग्गज भाजप नेत्यांनी शिंदेसेनेला सुनावलं. डॅमेज कंट्रोलसाठी शिंदेंनी आणखी एक जाहिरात दिली. मात्र, या सर्व मानापमान नाट्यामुळे बुंद से गयी वो हौद से नही आती.. याची कुजबूज सुरु झालीय तर जाहिरातींचा खर्च नेमका कुणी केला याचंही कवित्व रंगताना दिसत आहे.
फडणवीसांच्या नाराजीवरून विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय. 105 आमदारांच्या नेत्याचं 40 आमदारांनी मातेरं केल्याची टीका राऊतांनी केलीय. तर अपमान झाल्यावर फडणवीसांनी कार्यक्रमाला का जावं असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. अजित पवारांच्या नाराजीकडे लक्ष द्या असा पलटवार गिरीश महाजनांनी केला.