मनोज साने डेटिंग अ‍ॅप वरही सक्रीय; सापडले 'ते' चॅट! इतर महिलांशीही होते संबंध?

Mira Road Murder Case: मिरा रोड हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आलं आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची हत्या कशी केली? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 14, 2023, 06:26 PM IST
मनोज साने डेटिंग अ‍ॅप वरही सक्रीय; सापडले 'ते' चॅट! इतर महिलांशीही होते संबंध? title=
Mira Road murder case Manoj Sane brought pesticide to kill saraswati

Mumbai Murder Case Updates: मिरा रोड हत्याकांड प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपी मनोज वैद्य याने त्याची लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी व आपल्यावर संशय येऊ नये यासाठी सरस्वतीचे मृतदेह आधी कुकरमध्ये शिजवले तर, काही तुकडे कुत्र्यांना खायला घातले. अंगावर शहारा आणणाऱ्या या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. पोलिसांनी आरोपी मनोज वैद्यला अटक केली आहे. 

आरोपी मनोज सानेला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज साने सातत्याने जबाब बदलत असून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस या प्रकरणात पुरावे गोळा करत आहेत. तर आत्तापर्यंत जवळपास २० जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसंच, रस्वतीच्या बहिणींची डीएनए चाचणी करण्यात त्यांचे डीएनए रिपोर्ट जुळले आहेत. तसंच, सरस्वतीच्या बहिणांना मृतदेहाचे तुकडे अंत्यसंस्कारांसाठी सोपवण्यात आले आहेत. 

पोलिसांना आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार, आरोपी मनोज सानेचे इतर महिलांसोबतही संबंध होते. त्याच्या फोनमध्ये त्यांने इतर महिलांसोबत केलेले चॅटदेखील आढळले आहेत. त्याचबरोबर तो इतर डेटिंग अॅपवरही सक्रीय होता. यावरुनच सरस्वती आणि मनोज यांमध्ये भांडणे होत असतील, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

सुरुवातीला मनोजने सरस्वतीने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. त्यासाठी तिने किटकनाशके घेतल्याचंही त्याने सांगितले. मनोज याने तिच्या मृतदेहाचे इतके बारीक तुकडे केले आहेत की तिच्या शरिरात विषाचा अंश आहे की नाही हे तपासणे फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही अवघड होऊन बसले आहे. मात्र, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मनोज सानेनेच सरस्वतीला किटकनाशके दिल्याची शंका आहे. बोरीवलीच्या एका दुकान्यातून त्याने किटकनाशके खरेदी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसंच, त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्येही त्याने वेगवेगळ्या किटकनाशकांची नावे सर्च केली होती. 

पोलिसांनी याबाबत मनोजला जाब विचारला असता त्याने मी स्वतः आत्महत्या करणार होतो त्यासाठी मी हे सगळं सर्च केलं असा दावा केला आहे. मात्र, पोलिसांना संशय आहे की, मनोजनेच तिला किटकनाशके देऊन तिची हत्या केली आहे. याबाजूने पोलिस तपास करत आहेत. 

दरम्यान, मनोज साने याने सरस्वतीची हत्या ४ जून रोजी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. सात जून रोजी शेजाऱ्यांना मनोजच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा घराचा दरवाजा उघडल्यानंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. तेव्हा हे हत्याकांड उघडकीस आले. मनोजने घरातील किचनमध्ये तीन बादल्यांमध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.