कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 'इतके' लाख बाधित होतील! आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

राज्यासाठीचे नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर होण्याची शक्यता

Updated: Jan 4, 2022, 07:22 PM IST
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 'इतके' लाख बाधित होतील! आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती title=

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक नियम लागू करण्याचा निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आला. आम्हाला टोकाचं कुठलं पाऊल उचलायला लावू नका असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.

राज्यासाठीचे नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यासंदर्भात उद्या सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जी चर्चा होईल त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होणार आहे.

तर रुग्णसंख्या ८० लाखांच्या घरात
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोकं बाधित झाली, दुसऱ्या लाटेत ४० लाख लोकं कोरोनाच्या विळख्यात सापडली आणि जर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीत तिसरी लाट आली तर ८० लाख लोकं बाधित होण्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने अतिरिक्त मनुष्यबळ आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची केंद्राने उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राज्यात लावण्यात येणारे निर्बंध आणि लॉकडाऊन याविषयीची स्पष्ट परिभाषा केंद्राने मांडावी अशी मागणीही आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.