मुंबई, पुण्यात दुधाची आवक घटली

पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या दुधाची आवक घटली

Updated: Jul 19, 2018, 08:18 AM IST
मुंबई, पुण्यात दुधाची आवक घटली title=

पुणे : दूध बंद आंदोलनाचा परिणाम आज प्रकर्षानं जाणवतो आहे. पुण्यामध्ये आज दूध टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळेल ते आणि मिळेल तेवढं दूध पदरात पाडून घ्यावं लागत आहे. पुण्यातील अनेक भागांमघ्ये तर कुठलंच दूध पोहोचू शकलेलं नाही. त्यामुळे अशा लोकांना दूधाशिवाय दिवस काढावा लागणार आहे. पुण्यात प्रसिद्ध असलेलं चितळे दूध तर आज कुठेच आलेलं नाही. गोकुळ, कात्रज, कृष्णाई, काटे अशा काही दूध संघांचं दूध तेही अगदी थोड्या प्रमाणात उपलब्ध झालं आहे.

बुधवारी पुणे विभागात केवळ २६ लाख लीटर दूधाचं संकलन झालं. मात्र तेही शहरापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचू शकलेलं नाही. एकट्या पुण्याला दिवसाकाठी २५ लाख लिटर पेक्षा जास्त दूध लागतं. मात्र ती गरज जेमतेम स्वरुपातही भागणं अवघड आहे. दूध वितरण केंद्रावर दूध टंचाईचं चित्र पाहायला मिळत आहे. असा परिस्थितीत दूधाचा काळा बाजार होण्याची देखील शक्यता आहे. खुल्या बाजारात होणाऱ्या दूध विक्रीत दुधाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.