लक्ष्मीकांत रूईकर, बीड : ग्रामीण भागात दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतायत. अनेक तरुण आणि महिला कामाच्या शोधात गावं म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या जीवावर सोडून बाहेरगावी गेले आहेत. गावातल्या घरांना कुलप दिसत आहे. गावाच्या पारावर येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहणारी फक्त वृद्ध मंडळी दिसत आहे.
बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या दोनशे उंबऱ्याच्या पांगरी गावातली सध्या परिस्थिती बिकट आहे. हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. खरीप हातचं गेलं आता तर रब्बीचीही आशा मावळली. अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीत गावातल्या ऐंशी टक्के लोकांचं स्थलांतर झालं आहे. ऊसतोड आणि मुंबई-पुण्याला कामासाठी गेल्याने गावात अशी शांतता पाहायला मिळते आहे.
एकीकडे घरं कुलूपबंद असताना ज्येष्ठ नागरिक पारावर दुष्काळाच्या भीषण परिस्थितीवर चर्चा करत आहेत. शिरूर, पाटोदा, आष्टी, माजलगाव, गेवराई, बीड, केज, अंबाजोगाई या सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात हेच चित्र पाहायला मिळतंय.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर दुष्काळाची दाहकता सांगण्यास पुरेसे आहे. आता मायबाप सरकार या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करणार याकडं नजरा लागल्या आहेत.