चंद्रशेखर भुयार / अंबरनाथ : MHADA mega township in Ambernath : Jitendra Ahawad : मुंबईत घरे उभारणीला मर्यादा येत आहेत. तसेच नवी मुंबईत सीडकोच्या माध्यमातून घरे बांधण्यात येत आहेत. नवी मुंबईत उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने उरण येथे मेगा सिटीचे नियोजन होत आहे. आता अंबरनाथमध्ये म्हाडा मेगा टाऊनशिप उभारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चिखलोली धरणाला लागून 200 एकर जागेचा सर्व्हे करण्यात आला आहे. याचीबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या 200 एकर जागेचा बुधावारी म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मुंबई उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्यानं वाढत चालली आहे. मात्र हा वाढता भर मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
ही टाऊनशिप आजवर म्हाडाने उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत म्हाडाचा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र या परिसरात जी कनेक्टिव्हीटी आहे, त्यामुळे या भागाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. त्यामुळेच चिखलोली धरणाच्या बाजूला असलेली 200 एकर जागा खरेदी करण्याचा म्हाडाचा विचार आहे.
या जागेत आजवर म्हाडाकडून उभारण्यात आलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारली जाणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांनी ही माहिती दिली. ज्या जागेवर हा प्रकल्प उभारण्याचा विचार आहे, त्या चिखलोलीच्या प्रस्तावित जागेचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन हे स्वतः उपस्थित होते. दरम्यान, या सर्वात मोठ्या टाऊनशिपसाठी जपानच्या शासकीय कंपनीसोबत बोलणी सुरू असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.