पेब किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली तरुणी पाय घसरून दरीत पडली आणि...

जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या रियाला माथेरान येथील सह्याद्री रेसक्यू टीमने बाहेर काढले. 

Updated: Jun 17, 2024, 11:48 AM IST
पेब किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली तरुणी पाय घसरून दरीत पडली आणि... title=

Matheran Peb Fort Girl fall : माथेरानच्या पेब किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रेकींगसाठी गेलेली एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही तरुणी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी आहे. रिया साबळे (16) असे या तरुणीचे नाव आहे.  सुदैवाने या तरुणीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

निसरड्या पायवाटेवरुन पाय घसरला आणि...

माथेरानमध्ये अनेक पर्यटक हे मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येत असतात. त्यासोबत माथेरान हे ठिकाणी ट्रेकींगसाठीही प्रसिद्ध आहे. माथेरानजवळ असलेला पेब किल्ला हा ट्रेकींग करणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. रविवारी 16 जून रोजी अंधेरीतील 10 जणांचा ग्रुप माथेरानला फिरायला गेला होता. यावेळी ते सर्वजण ट्रेकींग करुन पेब किल्ल्यावरुन परतत असताना निसरड्या पायवाटेवरुन या ग्रुपमधील रिया साबळे (16) हिचा पाय घसरला. ती ५० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी काही अंतरावर जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या रियाला माथेरान येथील सह्याद्री रेसक्यू टीमने बाहेर काढले. 

कर्जतमधील रुग्णालयात दाखल

या दुर्घटनेत रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हात, पाय आणि पाठीलाही जबर मार लागला. यानंतर तिला कर्जतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे तिच्या ग्रुपमधील तरुण-तरुणीही घाबरले. त्यांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

पेब किल्ला पर्यटकांमध्ये प्रसिद्ध

दरम्यान माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. माथेरानच्या एका बाजूस सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर पेब किल्ला आहे. पेब किल्ल्याला विकटगड या नावाने देखील ओळखले जाते.  या पेब किल्ल्यावर असलेला कड्यावरचा गणपती हा प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे अनेक टेकर्सल तसेच पर्यटकांना पेब किल्ला खुणावत असतो.  या पेब किल्ल्यावर हजारो पर्यटक आणि ट्रेकर हे ट्रेकिंगसाठी येत असतात. मात्र त्यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असा सल्ला अनेकदा दिला जातो.