रायगड : माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेमधील मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवक आणि नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. गेले सात दिवस पालिकेत ते फिरकलेच नसल्याने त्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एरव्ही थंड असलेलं माथेरान गेली काही महिने माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने चांगलंच गरम झालंय. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर घोलप यांचं विकास कामांवर लक्ष नसल्याच्या अनके तक्रारी नगरसेवकांनी रायगड जिल्हाधिकारी आणि नगरविकास विभागाकडे केल्या आहेत. मात्र कारवाई होत नसल्यानं मुख्याधिकारी विरुद्ध माथेरान नगरसेवक आणि नागरिक असा वाद गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झाला आहे.
संतप्त माथेरानकरांनी यावेळी अनोखे गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीची पूजा केली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप ठोकलं. नागरिकांचे आंदोलन सुरु असताना अचानक मुख्याधिकारी सागर घोलप माथेरानमध्ये अवतरले. मात्र त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात असंतोष वाढत असल्याने नगर विकासविभागाने नवा अधिकारी द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.