जळगाव : जळगाव शहरातील एकूण सहा मंगलकार्यालयं प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. वारंवार सूचना देऊनही मंगलकार्यालयात गर्दी दिसून येत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मात्र ज्यांची लग्न या कार्यालयात करायचं ठरलं होतं, त्यांच्यासाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, तरी देखील प्रशासनाने सांगितलेले निर्बंध, पाळले गेले नाहीत, असं दिसत असल्याने महापालिका प्रशासनाने एकूण ६ मंगलकार्यालय सील केली.
रविवारी ही कारवाई करण्यात आली, पण दुसऱ्या दिवशी देखील महापालिकेकडून मंगलकार्यालयात होत असलेल्या लग्नांचं निरीक्षण महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडून सुरु होती.
ज्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक गर्दी आहे, त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. नियमांची पायमल्ली होत असेल तर मंगल कार्यालयांना देखील लाख ते दीड लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे.
मनपाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नातच प्रमाणापेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावल्याचंही दुसरीकडे बोललं जात आहे. तेव्हा फक्त ५० आणि १०० लोकांमध्ये विवाह पार पडत नसल्याचंही चित्र आहे.