मोदींच्या मंत्रिमंडळातील मराठी चेहरे

शपथविधीचा भव्य दिव्य कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे.

Updated: May 31, 2019, 02:08 PM IST
मोदींच्या मंत्रिमंडळातील मराठी चेहरे title=

नवी दिल्ली :  मोदींच्या शपथविधीला कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. काही वेळेतच शपथ घेतली जाणार आहे. शपथविधीचा भव्य दिव्य कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. मोदींच्या  मंत्रिमंडळात कोण-कोण असणार आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील एकूण ७ जणांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आहे. या ७ चेहऱ्यांपैकी  ४ जणांनी  मोदींच्या पहिल्या कार्यकाळात  मंत्रीपद भूषवलं आहे. या ७ पैकी ६ मंत्री हे मराठी आहेत. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात  नव्या चेहऱ्यांना संधीमिळाली, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत तर भाजपच्या संजय धोत्रे यांना स्थान मिळाले आहे. 

अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. तर भाजपचे संजय धोत्रे हे अकोला मतदार संघातून विजयी झाले आहेत. खासदार म्हणून धोत्रे यांची ही ४ थी वेळ आहे. दिग्गजांच्या पराभवामुळे या अनुभवी चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. परंतु या दोन्ही खासदारांना कोणते मंत्रीपद मिळते याची उत्सुकता सर्वांनाच आहे.      

मोदींच्या पहिल्या कार्यकाळात नितीन गडकरी यांनी दळणवळण खाते सांभाळले होते. तर प्रकाश जावडेकर हे केंद्रीय शिक्षणमंत्री होते. रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते.

केंद्रात रावसाहेब दानवे यांची वर्णी लागल्याने राज्यातील प्रदेशाध्यक्षपद रिकामी झाले आहे. त्यामुळे  राज्यातील प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळते, याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. 

मोदींच्या मंत्रिमंडळातील मराठी केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी 

प्रकाश जावडेकर

रामदास आठवले 

रावसाहेब दानवे

संजय धोत्रे 

अरविंद सावंत