घरचे मजुरी करुन खाण्यापिण्याएवढेच....; आरक्षणसाठी 10वीच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं!

Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं आहे. विहीरीत उडी घेऊन या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 23, 2023, 08:20 AM IST
घरचे मजुरी करुन खाण्यापिण्याएवढेच....; आरक्षणसाठी 10वीच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं! title=

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे आरक्षणसाठी आत्महत्यांचे सत्र सुरु झालं आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात शनिवारी मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केली असताना आणखी एका विद्यार्थ्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. मी मराठा समाजासाठी बलिदान देत आहे, अशी चिठ्ठी लिहीत दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं आहे.

गरिबीला कंटाळून आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलाने चिठ्ठी लिहिली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील 16 वर्षीय ओमकार बावणे याने रविवारी सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीये. दोन दिवसांपूर्वीच हदगाव तालुक्यातील वडगाव येथील 24 वर्षीय तरुण शुभम पवार याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. शुभमच्या चितेची आग थंड होण्यापूर्वी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

माझे आई वडील मोल मजुरी करून मला शिक्षण शिकवत होते पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी मराठा समाजासाठी बलिदान देत आहे असे या मुलाने चिठ्ठीत लिहीले आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीये. रविवारी रात्री नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला होता. या ठिकाणी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते.

काय लिहीलं होतं चिठ्ठीत?

"मी ओमकार आनंद बावणे. माझी परिस्थिती खूप खराब असल्यामुळे माझे आई वडील दररोज मजुरी करून खाण्यापिण्या एव्हढेच परिस्थितीला तोंड देत आहेत. मी शिक्षण घेत असल्यामुळे मला आई वडिलांची फिस भरण्याची शिक्षणाची परिस्थिती नसल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मी आज मराठा समाजासाठी बलिदान करीत आहे," असे या चिठ्ठीमध्ये लिहीलं आहे.