'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 24, 2023, 10:06 PM IST
'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार title=

Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन 24 ऑक्टोबरला संपली असून 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन महत्त्वाचं मानलं जात आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उपोषणावर ठाम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री आपल्या शब्दाला पक्के आहेत. पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण आम्हाला मान्य नाही. कारण ते टिकतच नाही. किती दिवस तुम्ही माझ्या मराठा समाजावर अन्याय करणार आहात, किती दिवस माझ्या मराठा समाजाला त्रास सहन करावा लागणार आहे. हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

आमच्या लेका-बाळांनी असं काय पाप केलं आहे की आमच्या हक्काचं आरक्षण असतानाही दिलं जात नाही. मराठा समाजाने आरक्षणाचे सर्व निकष पार केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि त्या शब्दाचा सन्मान करुन मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व पक्षांनी ठराव करुन आमच्याकडून शब्द घेतला होता की फक्त तीस दिवस द्या, आम्ही त्यांना चाळीस दिवस दिले. त्यामुळे माझ्या मराठा समाजाने याचा सन्मान केला. आता आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी आमचा सन्मान करावा, ही आमचा प्रामाणिक मागणी आहे. मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजाची भावना आहे.  त्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दाला खरं ठरावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. 

आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही, उद्यापासून लढायला आम्ही सज्ज झालोय. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असेल तर आम्ही त्यांचा सन्मान करतो पण आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी शिवरायांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून शपथ घेतलीय. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात दिली. मराठा आरक्षण द्यायला कटिबद्ध असल्याची घोषणा शिंदेंनी केली. तर गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला दिलंय. लोकसभेत आरक्षणाचा निर्णय का झाला नाही असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय तसच मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं कौतुकही केलं.