तोडफोड करणारे आंदोलनकर्ते नाहीत- मराठा आंदोलक

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलकांनी तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय.

Updated: Aug 9, 2018, 03:48 PM IST
तोडफोड करणारे आंदोलनकर्ते नाहीत- मराठा आंदोलक title=

पुणे : पुण्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलकांनी तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय. 'हे  जमलेले आंदोलनकर्ते नाहीतच', असं मराठा क्रांती मोर्चातील काही लोक सांगतात.आंदोलनकर्ते कार्यालयाच्या आवारात घुसले आणि घोषणा देत त्यांनी तोडफोड करण्यास सुरूवात केली.

या बंदचा परिणाम मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेसह जुना मुंबई पुणे हायवेवर देखील दिसून येत आहे. वाहनांनी नेहमीच गजबजलेल्या आणि सतत व्यस्त असलेल्या या मार्गावर शुकशुकाट दिसत असून अत्यल्प प्रमाणात वाहने दिसत आहेत.

शुकशुकाट 

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे एसटी आगाराने सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील बस स्थानकांवर शुकशुकाट पहायला मिळतोय. पोलिसांच्या सुचनेनुसार प्रवाशांची सुरक्षा आणि एसटीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी तसचं एसटीने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.