मराठा आंदोलक तरुणाची मुंबईत आत्महत्या, विनोद पाटलांचा सरकारला इशारा; '...तर उद्रेक अटळ आहे'

मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच एका आंदोलकाने आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय तरुण सुनील बाबुराव कावळे याने मुंबईत आत्महत्या केली  

शिवराज यादव | Updated: Oct 19, 2023, 01:05 PM IST
मराठा आंदोलक तरुणाची मुंबईत आत्महत्या, विनोद पाटलांचा सरकारला इशारा; '...तर उद्रेक अटळ आहे' title=

मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच एका आंदोलकाने आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय तरुण सुनील बाबुराव कावळे याने मुंबईत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये त्याने मराठा आंदोलनाचा मुद्दा मांडला असून, मुंबईतील मराठा आरक्षण दिवसाचा उल्लेख करत शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ट्वीट करत या आत्महत्येची माहिती दिली. तरुणाने वांद्रे येथे आत्महत्या केल्याची माहिती आहेय

विनोद पाटील यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. यावेळी त्यांनी तरुणांना टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहनही केलं आहे. मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

"माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका," असं आवाहन विनोद पाटील यांनी केलं आहे. 

"सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!," असंही त्यांनी म्हटलं आहे.