मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनच्या पराक्रमाला अडीचशे वर्ष पूर्ण

शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी मराठा लाईट इन्फन्ट्री म्हणजेच काळी पाचवी बटालियनच्या पराक्रमाला अडीचशे वर्ष पूर्ण झालीयेत. ४ फेब्रुवारी १७६८ ला अस्तित्वात आलेल्या या रेजिमेंटचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

Updated: Feb 9, 2018, 08:24 PM IST
मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनच्या पराक्रमाला अडीचशे वर्ष पूर्ण  title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी मराठा लाईट इन्फन्ट्री म्हणजेच काळी पाचवी बटालियनच्या पराक्रमाला अडीचशे वर्ष पूर्ण झालीयेत. ४ फेब्रुवारी १७६८ ला अस्तित्वात आलेल्या या रेजिमेंटचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

सर्वाधिक पराक्रमी बटालियन

मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सेकंड मराठा बटालियनला काळी पाचवीण असंही संबोधलं जातं. काळी पाचवीच्या जवानांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा स्तंभ. अनेक युद्धात जवानांनी दाखवलेल्या साहसामुळे आणि बलिदानामुळं काळी पाचवी बटालियन लष्करातली सर्वाधिक पराक्रमी बटालियन म्हणून पुढं आलीय. ४ फेब्रुवारी १७६८ ला सेकंड बटालियन म्हणून ही अस्तित्वात आली. ब्रिटीशांच्या सैन्यात सुरूवातीला बॉम्बे सिपोय म्हणून ही बटालियन ओळखली जायची. 

मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास

मराठा लाईट इन्फन्ट्रीने पराक्रमाची चुणूक दाखवली ती १८४० मध्ये झालेल्या अफगाण युद्धात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या पराक्रमाच्या जोरावरचं ब्रिटिशांनी विजय मिळवला असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या महायुद्धात इटली आणि जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रोमध्ये ब्रिटिश सैन्य अडकलं. त्यांना सोडविण्यासाठी फर्स्ट मराठा बटालियनचे सैनिक तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे लाइट म्हणजेच विद्युतवेगाने काम करणारी रेजिमेंट असा बहुमान रेजिमेंटला मिळाला. 

सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर ब्रिटीश सैन्य पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला. स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तानच्या हल्ल्याला परतवून लावतानाही मराठा लाईट इन्फन्ट्रीने अतुलनीय पराक्रम केला. १९६५ च्या युद्धात अमृतसरजवळ वाघामधून प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती. १९७१ च्या युद्धातही २२ मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत ढाक्यावर तिरंगा फडकावला. 

मराठा बटालियनला मिळालेले पदक

म्हणूनच या बटालियनशी निगडित प्रत्येकाला मराठा बटालियनचा अभिमान आहे. याच पराक्रमामुळे मराठा लाईट इन्फन्ट्रीला ५ अशोक चक्र, २८ परमविशिष्ट सेवा पदक, ५ महावीर चक्र, १५ कीर्ती चक्र, ४ उत्तम युद्ध सेवा मंडळ, ३५ अतिविशिष्ठ सेवा पदक, ४४ वीर चक्र, ६२ शौर्य चक्र, ३ बार टू शौर्य चक्र, १४ युद्ध सेवा मेडल, ४०० सेना पदक, १३ वार टू पदके मिळाली.  मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या पराक्रमाचा म्हणूनच प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे.