'..हाच सरकारचा प्रॉब्लेम', जरांगेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी..'

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Ranjangaon Rally Speech: "आमदार खासदार आधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलले नाही जे बोलले तेही स्वार्थ ठेऊनच बोलले. आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार मी रातपाठ एक करतोय," असं जरांगे-पाटील म्हणाले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 23, 2024, 09:32 AM IST
'..हाच सरकारचा प्रॉब्लेम', जरांगेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी..' title=
रांजणगावमध्ये बोलताना केलं विधान

-हेमंत चापुडे, रांजणगाव

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Ranjangaon Rally Speech: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसहीत पुण्यातील रांजणगाव येथे पोहचले आहेत. या ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये जरांगे-पाटलांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताना, आपल्याला आरक्षण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच जरांगे-पाटलांनी थेट उल्लेख न करता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे.

आरक्षणाशिवाय शांत बसणार नाही

"देशातला आणि राज्यातला कोणीही आडवा आला तरी ते आपल्याला आरक्षणापासून रोखू शकणार नाही अगदी देव जरी आडवा आला तरी ते शक्य नाही," असं जरांगे-पाटील म्हणाले. "आरक्षणाला विरोध करणारे 2-4 होते पण त्यांचाही कार्यक्रम केलाय. मराठ्यांच्या नादाला लागलात तर तो पाणी पाजल्याशिवाय मागे हटत नाही. आरक्षणाची लढाई सोपी नाही चार पिढ्यांचा संघर्ष आहे. मराठा प्रगतीकडे जाईल म्हणून मराठ्यांना एक होऊ द्यायचा नाही, असं सर्वांचं स्वप्न होतं," असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. "विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यातून देशाला आणि राज्याला शिक्षणाचा वारसा मिळाला. शाहाणे असाल तर लक्षात ठेवा, लोकांच्या वेदना जाणून घ्या. मायमाऊली लेकरं घेऊन रस्त्यावर उभी आहे. वेळीच भानावर या! अन्यथा तुमचीच जिरवल्याशिवाय मागे येणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या आगीत खाक व्हाल," असा इशाराही जरांगे-पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

भुजबळांवर निशाणा

"मी मुंबईत जाण्याआधीच मुंबई फुल होतेय का असे वाटते. माध्यमांवर अविश्वास दाखवू नका. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करु. माध्यमांवर दबाव असेल तर आम्हाला सांगा," असं आवाहनही जरांगे-पाटलांनी केलं. तसेच छगन भुजबळ यांचा थेट उल्लेख न करताना जरांगे-पाटलांनी, "येवल्याच्या ऐडपटाने मराठ्यांचे वाटोळे केलं. युद्ध लढावे मराठ्यांनी आणि जिंकावे पण मराठ्यांनीच. मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी चालेल पण इतरांच्या लेकरांवर अन्याय केला नाही इतरांच्या अंगावरील घाव स्वतःवर झेलला. आज मराठा अडचणीत आहे. आता तुम्ही त्याविरोधात राहात याची जाणीव मराठ्यांनी ठेवावी," असं जरांगे-पाटील म्हणाले.

नेत्यांवर गंभीर आरोप

"आमदार खासदार आधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलले नाही जे बोलले तेही स्वार्थ ठेऊनच बोलले. आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार मी रातपाठ एक करतोय. आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. राजकीय नेते रस्ते करतात म्हणजे फुकट नाही करत कारण या नेत्यांना त्यातून पैसे मिळतात," असा गंभीर आरोप जरांगे-पाटलांनी रांजणगावच्या सभेतून केला आहे. "बिगर पैसे मिळणारी कामे नेते करत नाही. ज्यात पैसे मिळणार नाही त्या कामांना हातही लावत नाही," असं म्हणत जरांगे-पाटलांनी राजकीय नेत्यांवर विकासकामातून पैसे खात असल्याचा आरोप केला आहे. "मी मँनेज होत नाही आणि फुटतही नाही हा सरकारचा प्रॉब्लेम आहे. मराठा समाज हाच मायबाप आहे. आरक्षणाचा गुलाल समाजाच्या डोक्यावर टाकणार आहे. तुम्ही फक्त एकजुट कायम ठेवा. पुणे जिल्ह्याने एकत्र यावे. जीव गेला तरी आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही," असा निर्धार जरांगे-पाटलांनी बोलून दाखवला.

मी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही

"मी असेल नसेल माहिती नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी झेलायची तयारी आहे पण आरक्षण घेऊन विरोध करणा-यांचा बंदोबस्त केल्याशिवाय माघारी येणार नाही. कधीकाळी एकत्र आलात ही एकजूट तुटू देऊ नका आणि विचारही मरु देऊ नका," असं आवाहन जरांगे-पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे. "मायबाप मानलेल्या मराठा समाजाशी मी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. राजकारणी लोकं गोड बोलून फूट पाडतील हे लक्षात ठेवा. आपल्याकडे पुरावे असूनही आपल्याला आरक्षण देत नाहीत. एकाच नोंदीवर 250 जणांना प्रमाणपत्र मिळालं आहे," असंही जरांगे-पाटील म्हणाले.

हेच पद माझ्यासाठी मोठं

"व्यसनापासून दूर राहा. सरकारी आधिकाऱ्यांची सुट्टी रद्द केली ते कामाला लागले आणि आता नोंदी सापडल्यात. आरक्षण मागणी करतो म्हणून तुम्ही शत्रू मानत असाल तर मराठ्यांच्या कल्याणासाठी लढत असताना मी तुम्हाला मोजत नाही. मराठा समाज जातीसाठी माझ्या पाठीशी उभा रहिलाय हेच पद माझ्यासाठी मोठं आहे. मला तुमच्या पदाची गरज नाही," असंही जरांगे-पाटील म्हणाले. "मी मरणाला भीत नाही. मला मारणं ऐवढं सोप नाही. मराठ्यांनी मनावर घेतलं तर तुमचा सुपडा साफ होईल," असंही जरांगे-पाटील विरोधकांना इशारा देताना म्हणाले.