'फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांतून जन्मलेल्या...'; मराठा आरक्षणासाठी मिटकरींचं शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी

Maratha Aarakshan Ajit Pawar Group Letter To CM Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज मंगळवारी सातवा दिवस आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 31, 2023, 09:33 AM IST
'फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांतून जन्मलेल्या...'; मराठा आरक्षणासाठी मिटकरींचं शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी title=
पत्राच्या माध्यमातून अमोल मिटकरींनी मांडली आपली भूमिका

Maratha Aarakshan Ajit Pawar Group Letter To CM Shinde: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा आज म्हणजेच मंगळवारी सातवा दिवस आहे. सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर बीड आणि धाराशिवमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारपासून ज्यांची कुणबी म्हणून नोंद आढळून आली आहे त्यांना तात्काळप्रमाणपत्र वाटली जातील असं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा मुंबईतील सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठक घेऊ चर्चा केली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते सध्याच्या राजकीय घडामोडींपासून दूर आहेत. मात्र असं असलं तरी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

आमदार प्रयत्नशील

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी एका दिवसाचं विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. हे पत्र अमोल मिटकरींनीच शेअर केलं आहे. "मराठा बांधवांनी संयम बाळगावा, मनोज जरांगेजी शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत. सरकार आरक्षण देण्यास प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री महोदयांनी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिलेत. एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास सर्व आमदार प्रयत्नशील आहेत," अशा कॅप्शनसहीत अमोल मिटकरींनी सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.

अतितात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे

"मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी संविधानिक गांधी मार्गाने जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. आज 6 वा दिवस आहे. त्यांनी प्राण पणाला लावले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज, सरकारने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर जस्टीस शिंदे यांच्या अहवालानुसार मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषदेमध्ये कुणबी अशी नोंद असलेल्या लोकांना प्ऱथम टप्प्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने सकाराता्मक पावले उचलत आहे. याचे समाधान आहे. मात्र मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्याला वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी चर्चा घडवून आणण्याकरिता अतितात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे," असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> 'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

दिशा मजबुत करण्यासाठी जरांगेंची समाजाला गरज

तसेच, 'संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या पुढील दिशा मजबुत करण्यासाठी समाजाला त्यांची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी तुर्तात उपोषण मागे घेऊन हा लढा सुरु ठेवावा. आम्ही त्यांच्यासोबथ आहोत,' असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

आरक्षण पुर्न:प्रस्थापित करायचे आहे

"मराठा समाजाला नव्याने आरक्षण द्यायचं नसून छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुर्न:प्रस्थापित करायचे आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून जन्मलेल्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवता येणार नाही. याकरिता सरकारने वेळ काढू नये. तात्काळ निर्णय़ घ्यावा, अशी विनंती आहे," असं या पत्राच्या शेवटी अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...'

सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याचा किंवा अध्यादेश जारी करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.